फुटबॉल विश्वातील तिसरी सर्वात जुनी स्पर्धा असलेल्या ड्युरंड कप स्पर्धेचा रविवारी (३ ऑक्टोबर) समारोप झाला. एफसी गोवाने कोलकातास्थित मोहमदेन स्पोर्टिंग क्लबला १-० अशा फरकाने पराभूत करत ही स्पर्धा आपल्या नावे केली. गोवा संघाचा कर्णधार एदू बेदिया विजयाचा नायक ठरला. नजीकच्या काळातील गोवा संघाचे हे पहिलेच मोठे विजेतेपद आहे.
गोवाचे पहिलेच विजेतेपद
यावर्षी इंडियन सुपर लीगची (आयएसएल) तयारी म्हणून एफसी गोवाने या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. गट फेरी तसेच बाद फेरीत एकही सामना न गमावता गोवा संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. विवेकानंद युवा भारती स्टेडियम कोलकाता येथे झालेल्या या अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी पूर्णवेळेत गोलशून्य बरोबरी केली. अतिरिक्त वेळेच्या १५ व्या मिनिटाला मिळालेल्या संधीचा लाभ उठवत गोवाचा कर्णधार एदू बेदिया याने गोल करत संघाचा विजय निश्चित केला. प्रशिक्षक जुआन फेरान्डो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोव्याचे पहिलेच मोठे विजेतेपद आहे.
पारितोषिक म्हणून मिळाली ईतकी रक्कम
स्पर्धेचे विजेतेपद मिळविल्यानंतर गोवा संघाला ४० लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले. उपविजेत्या मोहमेदन एफसीला २० लाख तर, उपांत्य फेरी गाठणाऱ्या बेंगलोर एफसी व बेंगलोर युनायटेड संघांना प्रत्येकी १० लाख रुपये मिळाले. एफसी गोवाला विजेतेपदाची ट्रॉफी म्हणून प्रेसिडेंट कप, ड्युरंड कप व शिमला ट्रॉफी मिळाली.
ऐतिहासिक स्पर्धा आहे ड्युरंड कप
ड्युरंड कप स्पर्धेचे हे १३० वे वर्ष होते. मागील वर्षी कोविड १९ मुळे स्पर्धेचा संपूर्ण हंगाम रद्द करण्यात आला होता. या वर्षी ही स्पर्धा पश्चिम बंगाल येथील विविध मैदानांवर खेळविण्यात आली. एकूण १६ संघांना या स्पर्धेमध्ये प्रवेश देण्यात आला होता. चार संघांचे प्रत्येकी चार गट यासाठी बनवले गेलेले.