गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) मंगळवारी एफसी ईस्ट बंगालने पहिल्या गोलची प्रतिक्षा अखेर संपुष्टात आणली, पण हैदराबाद एफसीने कोलकत्याच्या या मातब्बर संघाला 3-2 असे हरवत आपली अपराजित मालिका कायम राखली.
काँगो प्रजासत्ताकाचा जॅक्स मॅघोमा याने पूर्वार्धात केलेल्या गोलच्या जोरावर ईस्ट बंगालने मध्यंतरास आघाडी घेतली होती. त्यानंतर स्पेनचा 33 वर्षीय स्ट्रायकर अरीडेन सँटाना याने एका मिनिटात दोन गोल करीत हैदराबादला आघाडी मिळवून दिली. यात मध्य फळीतील 26 वर्षीय भारतीय खेळाडू हालीचरण नर्झारी यानेही भर घातली. नऊ मिनिटे बाकी असताना मॅघोमाने वैयक्तिक तसेच ईस्ट बंगालचा दुसरा गोल केला, पण ईस्ट बंगालला बरोबरी साधता आली नाही.
मॅन्युएल मार्क्वेझ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या हैदराबादचा हा 5 सामन्यांतील दुसरा विजय असून तीन बरोबरींसह त्यांचे 9 गुण झाले. त्यांनी सातवरून दोन क्रमांक प्रगती करीत पाचवे स्थान गाठले. चौथ्या क्रमांकावरील बेंगळुरू एफसीप्रमाणेच त्यांचे नऊ गुण झाले. बेंगळुरूचा 3 (9-6) गोलफरक हैदराबादच्या 2 (6-4) या तुलनेत सरस आहे. मुंबई सिटी एफसी (6 सामन्यांतून 13)आघाडीवर आहे. नॉर्थईस्ट युनायटेड एफसी व एटीके मोहन बागान यांचे प्रत्येकी 10 गुण आहेत. दोन्ही संघांचा गोलफरक 3 असा समान आहे. यात नॉर्थईस्टचे 8 गोल एटीकेएमबी पेक्षा (6) दोन जास्त आहेत. त्यामुळे नॉर्थईस्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे.
इंग्लंडचे मातब्बर रॉबी फाऊलर प्रशिक्षक असलेल्या ईस्ट बंगालला 5 सामन्यांत चौथ्यांदा पराभवाचा धक्का बसला. एकमेव बरोबरीसह त्यांचा एकमेव गुण व 11 संघांमधील अखेरचे स्थान कायम राहिले. पहिले तीन सामने हरल्यानंतर जमशेदपूरला बरोबरीत रोखून ईस्ट बंगालने आशा निर्माण केल्या होत्या, पण खाते आधी उघडून आणि मध्यंतरास आघाडी असूनही त्यांना अखेरीस रिकाम्या हाताने मैदान सोडावे लागले.
ईस्ट बंगालने पदार्पणातील पहिला गोल 26व्या मिनिटाला केला. मध्य फळीतील इंग्लंडचा 32 वर्षीय खेळाडू अँथनी पिल्कींग्टन याने ही चाल रचली. त्याने मध्य फळीतील जर्मनीचा 25 वर्षीय सहकारी मॅट्टी स्टेनमन याला पास दिला. त्यावेळी स्टेनमन गोलक्षेत्रालगत होता. पहिल्या प्रयत्नात चेंडूवर नियंत्रण मिळवत त्याने पास देताच मॅघोमाने ताकदवान फटका मारत गोल केला. हैदराबादचा गोलरक्षक सुब्रत पॉल याच्या हाताला लागून चेंडू नेटमध्ये गेला.
दुसऱ्या सत्रात 55व्या मिनिटाला ईस्ट बंगालचा बचावपटू नारायण दासने हैदराबादचा मध्यरक्षक हितेश शर्मा याला पाडले. त्यामुळे हैदराबादला फ्री किक देण्यात आली. मध्यरक्षक महंमद यासीरने घेतलेल्या फ्री किकला सँटानाने हळूवार पण अचूक हेडिंगद्वारे नेटची दिशा दिली. त्यानंतर काही क्षणांत यासीरने मध्य क्षेत्रात चेंडूवर ताबा मिळवला. त्याने मुसंडी मारत उजवीकडे बदली स्ट्रायकर लिस्टन कुलासो याला पास दिला. लिस्टनने मग नेटसमोरच असलेल्या सँटानाला पास दिला. सँटानाने मग शानदार फिनिशिंग करीत मजुमदारला चकवले.
नऊ मिनिटे बाकी असताना फ्री किकवर अँथनी पिल्कींग्टन याने मारलेल्या चेंडूवर मॅघोमाने गोल केला. त्यामुळे ईस्ट बंगालला पिछाडी कमी करता आली होती, पण हैदराबादच्या बचाव फळीने त्यांना आणखी मोकळीक दिली नाही.
हैदराबादने सकारात्मक सुरवात केली. चौथ्या मिनिटाला हैदराबादचा मध्यरक्षक हितेश शर्मा याने कौशल्याने चेंडूवर ताबा मिळवत मध्यरक्षक हालीचरण नर्झारीला पास दिला. नर्झारीचा प्रयत्न मात्र ईस्ट बंगालचा बचावपटू महंमद ईर्शादने रोखला. आठव्या मिनिटाला ईर्शादला ईस्ट बंगालच्या क्षेत्रात गोलक्षक देबजीत मजुमदार याच्याकडून चेंडू मिळाला, पण त्याने नियंत्रण मिळवताना चेंडूवर जास्त ताकद लावली. परिणामी हैदराबादचा फॉरवर्ड अरीडेन सँटाना याने चेंडू ताब्यात घेत मैदानालगत क्रॉस शॉट मारला. ईर्शाद आणि ईस्ट बंगालच्या सुदैवाने बचावपटू स्कॉट नेव्हीलने चेंडू रोखत बाहेर घालवला.
11व्या मिनिटाला हैदराबादला फ्री किक मिळाली. मध्यरक्षक महंमद यासीर याने गोलक्षेत्रात अप्रतिम मारलेला चेंडू ईर्शादने उडी घेत हेडिंगद्वारे बाहेर घालवला. त्यामुळे हैदराबादला कॉर्नर मिळाला. यासीरने गोलक्षेत्रात मारलेल्या चेंडूवर बचावपटू चिंगलेनसाना सिंग याला अचूक हेडिंग करता आले नाही.
13व्या मिनिटाला यासीरने डावीकडे दिलेल्या पासवर निखील पुजारीने घोडदौड केली. त्याला रोखण्यासाठी मजुमदार पुढे सरसावला, पण त्याने थोपवलेला चेंडू पुन्हा पुजारीकडेच गेला. अखेरीस ईर्शादने हेडिंग करीत चेंडू बाहेर घालवला. त्यामुळे हैदराबादला कॉर्नर मिळाला. यासीरने घेतलेल्या कॉर्नरवर हैदराबादचा बचावपटू ओडेई ओनेन्डीया याने हेडिंग केले, पण चेंडू रोखला गेला. त्यावर हितेशने प्रयत्न केला, पण चेंडू गोलपोस्टवरून गेला.
संबधित बातम्या:
– आयएसएल २०२०: जमशेदपूरने आघाडीवरील मुंबईला दहा खेळाडूंसह रोखले
– आयएसएल २०२०: ब्लास्टर्सचा धुव्वा उडवित बेंगळुरू चौथ्या स्थानावर
– आयएसएल २०२०: अँग्युलोच्या गोलमुळे ओदिशाला हरवून गोव्याची आगेकूच