फिफा अंडर १७ विश्वचषकाचा पहिला सामना भारतीय संघाने युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका यांच्याविरुद्ध गमावला आहे. हा सामना जरी भारतीय संघाने गमावला असला तरी या सामन्यात भारतीय संघाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणे आणि विजय मिळवणे या गोष्टीचे जे दडपण असते ते या संघाने प्रथमच अनुभवले आहे.
या सामन्यात भारतीय संघाला त्यांच्या कामगिरीला न्याय देता आला नाही हे खरे असले तरी काही नवीन समीकरणे या सामन्यात भारतीय संघात दिसून आली. या लेखात आपण चर्चा करणार आहोत भारतीय संघाच्या कालच्या सामन्यातील काही वैशिष्ट्यांची –
#१ भारतीय आघाडीवीरांचा आक्रमक खेळ-
अमेरिकेच्या वेगवान मिडफिल्डर्समुळे भारतीय संघाला जास्तीत जास्त वेळ डिफेन्सवर भर देत खेळ करावा लागला. परंतु दुसऱ्या हाफ मध्ये भारतीय फॉरवर्ड्सने उत्तम खेळ केला आणि अमेरिकेच्या डिफेन्समध्ये गोंधळ उडवून दिला. सामन्यानंतर अमेरिकेचे प्रशिक्षक जॉन हॅकवर्थ म्हणाले की, दुसऱ्या हाफमध्ये भारतीय प्रतिआक्रमणे खूप दर्जेदार होती. त्यांमुळे अमेरिकेच्या क्षेत्रात थोडाकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भारतीय खेळाडूंनी त्यांच्या फिनीशींगवर काम केले तर पुढील सामन्यात उत्तम कामगिरी करतील आणि गोल होऊ शकतात.
#२ डिफेन्समधील उत्तम बांधणी –
या सामन्यात भारतीय संघाने जरी ३ गोल स्वीकारले असले तरी त्यातील फक्त १ मैदानी गोल भारतीयांनी स्वीकारला आहे. जितेंद्र सिंग आणि अन्वर अली यांनी पहिल्या हाफमध्ये उत्तम खेळाचे प्रदर्शन केले होते.परंतु या सामन्यात आर.के.प्रवीण याने खूप लाजवाब प्रदर्शन केले.
#३ कोमल थाटाल याचे प्रदर्शन –
अनेक मोठ्या क्लबचा मुख्य टार्गेट असणाऱ्या या खेळाडूने काल सामन्यात उत्तम प्रदर्शन केले. त्याने विरोधी संघाच्या सीमेत केलेले रन खूप उत्कंटावर्धक होते. त्याची गती आणि पडदालित्य वाखाणण्याजोगे होते. तो सामन्यात गोल करण्याच्या खूप जवळ आला होता पण त्याला गोल जाळ्याचा अचूक वेध घेता आला नाही.
#४ भारतीय गोलकीपर धीरज मोइरांगथेमची जबरदस्त कामगिरी –
या सामन्यात भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले असतेपण धीराजने काल चांगली कामगिरी करत ती नामुष्की भारतीय संघावर येऊ दिली नाही. धीराजने या सामन्यात डोळ्याचे पारणे फेडणारे काही अफलातून सेव केले.
#५ एकूणच चांगला खेळ-
२०१७ मध्ये अमेरिकेचा संघ खूप भन्नाट लयीत आहे. हा संघ गोल करण्याची नवीन मशीन बनला आहे. मागील ११ सामन्यांतील १० सामने हा संघ जिंकला आहे. एक सामना या संघाने बरोबरीत राखला आहे. जिंकलेल्या त्या १० सामन्यात अमेरिकेने प्रत्येक मान्यता ३ किंवा त्यापेक्षा जास्त गोल केले आहेत. या मागील सामन्यात त्यांनी ४२ गोल केले आहेत. या संघाचा एकूण खेळ पाहता भारतीय संघाने त्यांना फक्त एक मैदानी गोल करू देणे हा खेळ म्हणजे खूप वाईट नाही.