---Advertisement---

FIH Hockey Women’s Nations Cup: भारताने जिंकले विजेतेपद, अंतिम सामन्यात यजमान न्यूझीलंडला 2-0 ने केले पराभूत

On: सोमवार, जून 22, 2026 10:11 AM
---Advertisement---

रविवारी (२१ जून) ऑकलंड येथे झालेल्या एफआयएच हॉकी महिला नेशन्स कप २०२५-२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा २-० ने पराभव केला. या विजयामुळे भारताला पुढील हंगामाच्या एफआयएच हॉकी महिला प्रो लीगमध्ये बढती मिळाली आहे. या सामन्यात लालरेम्सियामी प्लेयर आफ द मॅच ठरली. भारताकडून नवनीत कौर आणि सुनेलिता टोपोने गोल केले.

नवनीतने ४ थ्या मिनिटाला गोल करत भारताला सुरूवातीलाच आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सुनेलिताने १५ व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी २-० अशी केली. भारताने या सामन्यात उत्कृष्ट बचावाचे प्रदर्शन करत आपली आघाडी टिकवली आणि विजेतेपदावर नाव कोरले. या विजयाबरोबरच भारताला एफआयएच हॉकी महिला प्रो लीगमध्ये पुनरागमन करता येणार आहे.

अंतिम सामन्यात यजमान संघाने सुरूवातीला काही वेळ चेंडूवर नियंत्रण ठेवले होते आणि आघाडी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र नवनीतने पेनल्टी कॉर्नर मिळवल्यानंतर चौथ्या मिनिटाला त्याचे गोलमध्ये रुपांतर केले. भारताने आघाडी घेतल्यानंतर न्यूझीलंडचे गोल करण्याचे अनेक प्रयत्न हाणून पाडले. त्यानंतर पहिल्या सत्रात मिळालेल्या आघाडीला भारताने दुप्पट केले. १५ व्या मिनिटाला सुनेलिताने टोपोच्या जोरदार शॉटला दिशा देत गोल केला.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडने परत येण्याचा प्रयत्न केला. त्यांना गोल करण्याच्या संधीही मिळाल्या, मात्र या सत्रात एकही गोल झाला नाही, ज्यामुळे भारताची आघाडी कायम राहिली. भारताने तिसऱ्या क्वार्टरमध्ये उत्तम बचाव करत यजमानांना गोल करण्याची एकही संधी दिली नाही. चौथ्या क्वार्टरमध्ये सुरूवातीलाच न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र सविताने तो हल्ला परतवून लावला. भारताने आपली प्रभावी बचावात्मक कामगिरी सुरूच ठेवली आणि अखेरीस २-० विजय निश्चित करत विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेत दीपिका सहा गोलांसह संयुक्तपणे सर्वाधिक गोल करणारी खेळाडू ठरली. ही कामगिरी तिने अमेरिकेच्या ऍश्ले सेसासोबत विभागून घेतली. भारताने या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. भारताने अ गटामधील साखळी सामन्यांमध्ये अमेरिका (३-२), जपान (२-१) आणि उरुग्वे (३-२) यांचा पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीत चिलीचा ६-० असा मोठा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा २-० ने पराभव केला.

भारतीय संघांच्या कामगिरीची दखल घेत हॉकी इंडियाने प्रत्येक खेळाडूला ३ लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला १.५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---