चेन्नई। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाला आजपासून (९ एप्रिल) सुरुवात झाली. या स्पर्धेतील पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. या सामन्यात बेंगलोरने शेवटच्या चेंडूवर २ विकेट्सने विजय मिळवला आहे.
बेंगलोरच्या या विजयामुळे मुंबईची गेल्या ८ वर्षातील पहिल्या सामन्यातील पराभवाची मालिका मात्र, कायम राहिली आहे. मुंबईने साल २०१३ पासून आत्तापर्यंत एकाही हंगामात त्यांचा पहिला सामना जिंकलेला नाही. विरोधाभास म्हणजे गेल्या ८ वर्षांतच मुंबईने आयपीएलची ५ विजेतीपदंही मिळवली आहेत.
तर या लेखात आपण पाहू की गेल्या ८ वर्षांत ज्या संघांनी मुंबई इंडियन्सला त्यांच्या पहिल्या सामन्यांत पराभूत केले, त्या संघांच्या त्या त्या हंगामाखेर काय स्थिती होती.
साल २०१३ ला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच मुंबई इंडियन्सचा पहिला सामना झाला होता. या सामन्यांत बेंगलोरने मुंबईला पराभूत केले होते. त्या हंगामाखेर बेंगलोर संघ ५ व्या स्थानावर राहिला तर मुंबईने विजेतेपद जिंकले. २०१४ साली कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सला पहिल्या सामन्यात पराभूत केले. त्या हंगामाचे विजेतेपद कोलकाताने जिंकले होते. मुंबईला मात्र, या हंगामात चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
नंतर २०१५ सालीही कोलकातानेच मुंबईला पहिल्या सामन्यात पराभूत केले. पण या हंगमात कोलकाता गुणतालिकेत ७ व्या क्रमांकावर राहिले. तर मुंबईने दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले.
साल २०१६ आणि २०१७ या दोन्ही हंगामात मुंबईचा पहिला सामना रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाशी झाला होता. या दोन्ही हंगामात पुण्याने मुंबईचा पहिल्या सामन्यांत पराभव केला होता. २०१६ साली पुण्याची कामगिरी नंतर फारशी बरी झाली नाही. त्यांना हंगामाखेर ७ व्या क्रमांकावर रहावे लागले. या हंगामात मुंबई ५ व्या क्रमांकावर राहिली. २०१७ हंगामात मात्र पुण्याने शानदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली होती. मात्र या हंगामाच्या अंतिम सामन्यांत त्यांना मुंबईकडूनच पराभवाचा सामना करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
साल २०१८ ला चेन्नई सुपर किंग्सने २ वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन केले होते. या हंगामात त्यांनीच मुंबईला त्यांच्या पहिल्या सामन्यांत पराभूत केले. विशेष म्हणजे या हंगामात पुढे जाऊन चेन्नईने त्यांचे तिसरे विजेतेपदही जिंकले. तर मुंबई या हंगामात ५ व्या स्थानी राहिले.
साल २०१९ हंगामात मुंबईचा पहिला सामना झाला तो दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध. दिल्लीनेही मुंबईला पहिल्या सामन्यांत पराभूत केले. त्यानंतरही दिल्लीने चांगली कामगिरी केली. पण दिल्लीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर मुंबईने या हंगमाचे विजेतेपद मिळवले.
यानंतर २०२० हंगामात पुन्हा एकदा मुंबई समोर पहिल्या सामन्यांत चेन्नईचे आव्हान उभे राहिले. चेन्नईनेही मुंबईला पराभूत करत चांगली सुरुवात केली. मात्र, पुढे जाऊन चेन्नईची कामगिरी खराब झाली. चेन्नईला या हंगामात ७ व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, तर मुंबईने विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद पटकवले.
आता यंदादेखील मुंबई इंडियन्स पहिला सामना पराभूत झाली आहे, तर बेंगलोरने विजयी सलामी दिली आहे. आता हे दोन संघ पुढे कशी कामगिरी करतात हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
केवळ एमएस धोनी आणि पोलार्ड यांचा समावेश असलेल्या ‘त्या’ विक्रमाच्या यादीत आता डिविलियर्सही सामील