भारताने आपली पहिली इंटरनॅशनल मॅच कधी खेळली? असा प्रश्न विचारल्यावर अनेक रँडम उत्तर येतात. काहीजण 1930, काही 1935, तर कोणी थेट 1947 सांगून मोकळे होतात. मात्र, काही अस्सल क्रिकेटप्रेमी अगदी तारखेसह याचं खरं उत्तर देतात. ते म्हणजे 25 ते 28 जून 1932. भारताने कर्नल सी के नायडू यांच्या नेतृत्वात क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर आपली पहिली टेस्ट खेळली. या टेस्टमध्ये भारताला पहिल्यांदा बॉलिंग करावी लागली. आता यालाच आणखी एक पूरक प्रश्न असा की, भारताकडून पहिला बॉल टाकणारे बॉलर कोण? जास्त उत्सुकता ताणता आम्हीच प्रश्नाचे उत्तर देतो, तर भारताकडून क्रिकेट इतिहासातील पहिला बॉल टाकणारे बॉलर होते मोहम्मद निसार. आज त्याच मोहम्मद निसार यांच्या आयुष्याचा घेतलेला हा आढावा.
स्वातंत्र्यआधीच्या पंजाब प्रांतातील होशियारपूर येथील मोहम्मद निसार (Mohammad Nissar) यांचा जन्म. एकदम भारदस्त शरीरयष्टी, सहा फुटांपेक्षा जास्त उंची. अगदी एखाद्या फास्ट बॉलरला साजेशी अशीच. अगदी कमी वयातच त्यांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. लाहोरच्या छावणीत इंग्रज क्रिकेट खेळायचे तिथेच त्यांनी क्रिकेटचे धडे आत्मसात केले. कॉलेजसाठी खेळू लागले. त्यांचं अगदी कमी वयात नाव झालं. ज्यावेळी टीम इंडिया आपली पहिली टेस्ट खेळायला इंग्लंडला जाणार होती, तेव्हा अवघ्या 22व्या वर्षी त्यांना त्या जहाजात बसवून इंग्लंडला पाठवल गेलं. फक्त एक टेस्ट खेळायला इंग्लंडला गेलेल्या टीम इंडिया इंग्लंडमध्ये जवळपास 26 फर्स्ट क्लास मॅच खेळल्या.
तर आपण आपल्या मूळ विषयाकडे म्हणजे मोहम्मद निसार यांच्याकडे येऊ. टूरवर निसार यांनी 71 विकेट्स घेतलेल्या. युवा आणि एक तगडा फास्ट बॉलर म्हणून त्यांना इलेव्हनमध्ये संधी मिळाली. कॅप्टन सी के नायडू यांनी पहिली ओव्हर टाकण्यासाठी त्यांच्या हातात बॉल दिला. हा क्षण ऐतिहासिक होणार होता. कारण, भारतासाठी पहिला बॉल टाकण्यासाठी निसार धावत होते. बॉल वेल लेफ्ट केला गेला. पहिली ओव्हर टाकली गेली. दुसऱ्या बाजूने अमरसिंग आले. त्यानंतर निसार यांना इतिहासात नोंद करायला आणखी एक क्षण सापडला. ज्या हर्बर्ट सटफ्लिक यांचा विकेट काढण्यासाठी बॉलर्स देव पाण्यात घालून ठेवायचे, त्या सटफ्लिक यांचा आपल्या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर एक इनस्विगिंग यॉर्कर टाकत निसार यांनी बोल्ड उडवला. लॉर्ड्सवर स्मशान शांतता पसरलेली. यातून इंग्लिश फॅन्स सावरतात तोपर्यंत पाचव्या बॉलवर दुसरे ओपनर पर्सी होल्म्स यांनादेखील निसार यांनी क्लीन बोल्ड केलेले. ज्या जोडीने अगदी काही दिवसांपूर्वीच यॉर्कशायरसाठी 555 रन्सची पार्टनरशिप केलेली, त्या दोघांना निसार यांनी माघारी पाठवलेल. पुढे आणखी तीन विकेट घेत मोहम्मद निसार लॉर्ड्सच्या ऑनर्स बोर्डवर आपले नाव नोंदवण्यात यशस्वी ठरले. फायफर त्यांच्या नावे जमा झालेला.
टीम इंडियाचे तेव्हाचे कॅप्टन कर्नल सीके नायडू म्हणतात, “बॉडी लाईन सीरिजमध्ये हेरॉल्ड लारवूड जगातील सर्वात फास्ट बॉलर म्हणून समोर आलेला. मात्र, मला विचारलं तर त्यावेळी जगातील सर्वात फास्ट बॉलर होता मोहम्मद निसार.”
त्यावेळी भारत जास्त क्रिकेट खेळत नव्हता ही गोष्ट निसार यांच्या विरोधात गेली. ती पहिली टेस्ट. त्यानंतर 1934 मध्ये तीन टेस्ट आणि 1936 मध्ये तीन टेस्ट खेळून त्यांचं करिअर 6 टेस्ट 25 विकेटवर थांबलं. पुढे दुसऱ्या महायुद्धामुळे क्रिकेट बंद झालं आणि एक अख्खी क्रिकेटर्सची पिढी वाया गेली. आजही स्वातंत्र्य आधीचा सर्वात फास्ट भारतीय बॉलर म्हणून निसंकोचपणे मोहम्मद निसार यांचंच नाव घेतलं जातं.
त्यांच्याबाबतचा एक किस्सा म्हणजे, ज्यावेळी दुसऱ्या महायुद्धामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद झालं, तेव्हा निसार यांनी चक्क युनिव्हर्सिटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ते लाहोर युनिव्हर्सिटीसाठी खेळत. खेळाडूंना रेल्वेच्या थर्ड क्लासमधून प्रवास करावा लागायचा. सोयीसुविधा नव्हत्या, तेव्हा लाहोर युनिव्हर्सिटीच्या कॅप्टनने म्हटले, “तुम्ही मोठे खेळाडू आहात तुम्हाला आमच्यासारखं राहायला जमेल का?” त्यावर निसार यांच उत्तर होतं, “सोयीसुविधा मिळाव्या म्हणून मी इथे येत नाही. मला क्रिकेट खेळायला मिळावं म्हणून मी येतो.”
1947 मध्ये देशाची फाळणी झाली. निसार पाकिस्तानात गेले. थोडं फार क्रिकेट कोचिंग केलं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या उभारणीत महत्त्वाचा सहभाग नोंदवला. त्यानंतर वयाच्या अवघ्या 53व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
आज इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेत जाऊन आपले फास्ट बॉलर्स धुमाकूळ घालतात त्यांची वाहवा होते. मात्र, या सर्वाला भारतीय फास्ट बॉलिंगचे मूळपुरुष म्हणून मोहम्मद निसार यांचे आशीर्वाद नक्कीच आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ मराठमोळ्या व्यक्तीने भारतासाठी खेळलाय पहिला बॉल, 90टक्के लोकांना माहितीच नाही; तुम्ही घ्या जाणून
टीम इंडियाची ‘मेडन ओव्हर मशीन’ बापू नाडकर्णी, सलग 21 ओव्हर टाकलेल्या निर्धाव; रंजक आहे प्रवास