fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

गोष्ट त्या टीम इंडियाची, जिचे कर्णधार होतं असे राजे महाराजे

Story of first ever test match played by Indian Cricket Team

-कौशिक एकनाथ साऊळ 

भारतीय क्रिकेट संघाने आजपर्यंत मोठी प्रगती केली आहे. कसोटी, वनडे क्रिकेटमध्ये आज भारतीय संघ अव्वल दर्जाचा संघ म्हणून ओळखला जातो. पण 25 जून हा दिवस भारतीयांसाठी विशेषकरून खास आहे. कारण या दिवशी फक्त भारताने लॉर्ड्सवर कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता म्हणूनच नाही तर याच दिवशी भारतीय संघाने पहिला क्रिकेट सामना खेळण्यास सुरुवातही केली होती.

25जून 1932 ही तीच तारीख आहे ज्या दिवशी भारतीय क्रिकेटचा जन्म दिवस असतो.स्वतंत्र होण्याच्या पंधरा वर्षे अगोदर याच तारखेला भारतीय संघाचे नाव क्रिकेट इतिहासात नमूद झालं होतं. पण त्या कसोटीआधी काय झालं हे जाणून घेण्याआधी याची सुरुवात नेमकी कुठून आणि कशी झाली हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे .

पहिले भारतीय कर्णधार सी. के. नायडू

एमएस धोनी पासून कपिल देव आणि विराट कोहली पर्यंत भारतीय क्रिकेटची धुरा सांभाळणाऱ्या या नायकांना सुपर स्टार म्हटलं जातं. पण भारतीय क्रिकेटचा पहिला सुपर स्टार जर कुणी होता तर ते होते ‘कर्नल सी. के.नायडू’. 1895ला नागपुरात जन्म झालेल्या नायडू यांनी वयाच्या विसाव्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाऊल टाकले. पण भारतीय संघाच्या उदयामागे कर्नल नायडू यांचं खूप मोठं योगदान आहे.

जेव्हा नायडू यांना भारताचे कर्णधारपद मिळाले तेंव्हा ते 37वर्षांचे होते. म्हणजे ज्या वयाच्या आसपास एमएस धोनीच्या संन्यासाची चर्चा रंगत आहे त्याच वयात कर्नल नायडू यांनी भारतासाठी पदार्पण केलं. कर्नल उंच आणि धिप्पाड शरीरयष्टीचे आक्रमक फलंदाज होते. उंच उंच षटकार मारणं ही त्यांची विशेष ओळख होती.

भारतीय संघ बांधणीच्या चर्चेला कशी सुरुवात झाली

1932मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याआधी भारतात धार्मिक विभागणी नुसार देशांतर्गत सामने खेळले जायचे. जसे की हिंदू, मूस्लिम्स, ख्रिश्चन. इंग्रजांच्या गुलामीच्या काळात क्रिकेट भारतभर पसरत होतं. याच दरम्यान इंग्लंडच्या अधिकाऱ्यांनी ठरवलं की एक संघ भारत दौऱ्यासाठी पाठवला पाहिजे.

साल 1926मध्ये MCCच्या संघाने भारत दौरा केला. इंग्लंडचे पूर्व ऍशेज कर्णधार आर्थर गिलीगन MCC संघाचे कर्णधार होते. तसेच या संघात अनेक कसोटी क्रिकेटरही सामील होते .या दौऱ्यात 26 प्रथम श्रेणी सामने खेळण्यासाठी आलेल्या MCC संघाचा एक सामना एक डिसेंबरला बाँबे जिमखाना मध्ये हिंदू संघा विरुद्ध होता. या सामन्यात कर्नल नायडूंनी षटकारांचा विश्वविक्रम मोडीत काढला आणि अकरा षटकार लगावले. तसेच तेरा चौकारांसह त्यांनी 153 धावांची अप्रतिम खेळी साकारली. त्या सामन्यांत कर्नल नायडूंनी मॉरिस एस्टल आणि टेट सारख्या इंग्लिश गोलंदाजांविरुध्द हे प्रदर्शन केलं होतं. या खेळी नंतर इंग्लिश कर्णधार गिलिगन यांनी भारतीय क्रिकेट बद्दल विचार करायला सुरुवात केली. गिलिगन यांनी क्रिकेट अधिकाऱ्यांना स्वतः सांगितलं की, “भारत आता कसोटी क्रिकेटसाठी सक्षम आहे आणि भारताला कसोटीचा दर्जा मिळायला हवा ”

या सामन्यानंतर लगेच गिलिगन यांनी भारतीय क्रिकेटचे कर्ता-धर्ता पटियालाचे महाराज भूपेन्द्र सिंह यांच्या बरोबर दिल्लीत या बाबत चर्चा केली आणि मग लवकरच भारतीय क्रिकेट बोर्डाची स्थापना झाली .

राजा महाराजांच्या काळातले क्रिकेट

भारतीय खेळाडूंनी हे दाखवलं होतं की आता भारत कसोटी खेळण्यासाठी सक्षम आहे .पण त्यावेळी ना प्रायोजक होते ना इतर कुठलं कमाईचं साधन. म्हणून बोर्डालाही क्रिकेट चालवण्यासाठी महाराजांच्या कृपादृष्टीवर अवलंबून रहावं लागत होतं. त्यामुळे त्या काळात संघाचा कर्णधारपण राजाच असे. तसं पाहिलं तर संघ बनवण्याच्या योजनेत अशीही एक चर्चा होती की कर्णधारपद एखाद्या इंग्रजाला देण्यात यावं जेणेकरून संघांतील हिंदू मुस्लिम किंवा इतर धर्मीय लोक बंड करणार नाहीत. पण नंतर प्रस्ताव नाकारण्यात आला .

भारतीय संघाचा पहिला इंग्लंड दौरा

1932मध्ये एक चर्चा सुरू होती की, भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. जिथं संघ 26 प्रथम श्रेणी सामने आणि एक अधिकृत कसोटी सामना खेळणार आहे. पण अजूनही एक मोठा प्रश्न अनुत्तरित होता “संघाचं कर्णधारपद कुणाला द्यावं.” चर्चा झाली की, या दौऱ्याचं कर्णधारपद नवाब पतौडी सिनियर यांना द्यावं. चर्चेत रणजित सिंह यांचे भाचे दिलीप सिंह यांचंही नाव कर्णधारपदासाठी पुढं आलं होतं. पण त्यावेळी हे दोघंही त्या दौऱ्यात इंग्लंडसाठी खेळत होते. या दोन नावांनंतर चर्चा पुढं गेली आणि मग पटियालाचे महाराज आणि विजयनगरचे महाराज यांना कर्णधारपदाची प्रस्तावना देण्यात आली. पण भारतीय संघाचा जो दौरा होता तो एप्रिलला सुरू होऊन ऑक्टोबरला संपणार होता म्हणून पटियाला आणि विजयानगरमच्या महाराजांनी आपापली राज्ये न सोडण्याच्या इरादानं दौऱ्यावर जाण्यासाठी माघार घेतली.

पहील्या दौऱ्यासाठी 2 एप्रिल 1932ला मुंबईच्या पोर्ट बंदरातून “स्ट्रेथनेवर” जहाजातून संघ निघाला. या संघात सात हिंदू, पाच मुस्लिम, चार पारशी आणि दोन शीख खेळाडूंना सामील करण्यात आलं होतं आणि कर्णधारपदाची सूत्रं पोरबंदरच्या महाराजांना सोपवण्यात आली.पण त्यांना ही जबाबदारी त्यांच्या खेळामुळे नाही तर त्यांच्या चांगल्या बोलण्याच्या स्वभावामुळे देण्यात आली होती. पण जसा संघ ब्रिटनला पोहोचला आणि तिथं सराव सामने खेळू लागला तसं स्पष्ट दिसू लागलं की पोरबंदरच्या महाराजांना संघ आणि कर्णधारपद सांभाळणं कठीण जात आहे. त्यावेळी त्यांच्यावर या प्रकारचे विनोदही केले गेले.

“पोरबंदरच्या महाराजांकडे रोल्स रॉयल खूप आहेत पण धावा कमी ”

सामन्याच्या एक दिवस आधी 24 जून 1932 ला भारतीय खेळाडूंनी केलं बंड

ऐतिहासिक कसोटीच्या एक दिवस आधी पोरबंदरच्या महाराजांनी निर्णय घेतला की ते कर्णधार पदावरून बाजूला होत आहेत आणि त्याच बरोबर त्यांनी कर्णधारपदाची सारी सूत्रे संघाचे सदस्य कर्नल सी. के. नायडू यांच्याकडे सोपवली. पण संघातल्या बऱ्याच खेळाडूंना भारताच्या कर्णधारपदी महाराज किंवा नवाबच स्वीकारहार्य होते. पण कर्नल नायडू तर सामान्य माणुस होते. संघातल्या खेळाडूंनी सामन्याच्या आदल्या रात्री बंड पुकारले आणि पटियालाच्या महाराजांकडे आपली नामंजूरी जाहीर केली. पण पटियालाच्या महाराजांनी कडक निर्देश देऊन सांगितलं की, “संघाचं नेतृत्व नायडूच करतील आणि जो कुणी याचा विरोध करेल तो पुन्हा भारतासाठी खेळू शकणार नाही ”

ऐतिहासिक तारीख 25जून 1932 – भारताचा पहिला कसोटी सामना 

एवढ्या सगळ्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर अखेर तो दिवस आला, ज्याने भारतीय संघाला जन्म दिला. लॉर्डसच्या मैदानावर डग्लस जोर्डिनच्या साथीने भारताचे पहिले कर्णधार कर्नल नायडू पॅविलियन मधून निघाले आणि नाणेफेक झाली. त्यावेळी भारतीय संघ कसोटी दर्जा मिळवणारा जगातील सहावा देश बनला .

सामन्यात काय झालं ?

इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी निवडली. पण सामन्याच्या पहिल्या तासात भारताची दणदणीत सुरुवात झाली. 19 धावांवर इंग्लंडच्या संघाने तीन गडी गमावले. पण यानंतर वेली हेमंड आणि कर्णधार डग्लस जोर्डिनने संघाला सावरले आणि शंभरीच्या पुढं नेलं. पण शंभर धावा पार करताच वेली हेंमंड 35 धावांवर अमर सिंगच्या चेंडूवर त्रिफळाचित झाले. यानंतर एडी पेंटर, डग्लस जॉर्डन एक एक करून सगळा इंग्लिश संघ 105.1 षटकांत 259 धावांवर सर्व बाद झाला. या डावाची लक्षणीय बाब म्हणजे इंग्लिश कर्णधार डग्लस जॉर्डनला नायडूंनी बाद केलं होतं. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटच्या पहिल्या डावातच मोहम्मद निसार यांनी पाच गडी बाद केले होते. मोहम्मद निसार भारताचे पहिले जलदगती गोलंदाज होते. त्यांनी या संपूर्ण दौऱ्यात 71 गडी बाद केले होते. जेव्हाही भारतीय क्रिकेट इतिहासाची चर्चा होते तेव्हा त्यांची आणि अमर सिंग या जलद जोडीची नेहमीच आठवण काढली जाते.

भारतीय संघांची पहिली फलंदाजी – 

यानंतर पहिल्यांदा भारतीय फलंदाज मैदानात उतरले. गावस्कर -श्रीकांत, सचिन -सेहवाग, रोहित -शिखरच्या आधी भारताकडून जी पहिली सलामी जोडी उतरली, ती होती जनार्दन नवले आणि नौमल जौमल यांची. या दोन्ही फलंदाजांनी चांगला संयम दाखवला आणि पहिला दिवस संपेपर्यंत नाबाद राहिले. पहिल्या दिवशी दोघांनी मिळून तीस धावा केल्या. पण त्यानंतर 1 दिवस विश्रांतीचा होता. त्यानंतर पुन्हा खेळ सुरु झाल्यावर 27 जूनला सुरुवातीलाच 39 धावांवर भारताला जनार्दन नवलेच्या रूपात पहिला धक्का बसला. यानंतर सय्यद वजीर खेळण्यासाठी आले. पण 63 धावा होताच भारताला दूसरा झटका लागला. नौमल जौमल 33 धावा करून बाद झाले. भारताचे आता दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते. आता नंबर चारवर खेळण्यासाठी उतरले कर्णधार सी .के .नायडू. वजीर अली आणि नायडुंनी भारताचा डाव पुढं नेला. दोघांनी संघाला शंभरी पार पोचवलं आणि दोघं जोपर्यंत खेळपट्टीवर होते तोपर्यंत असं वाटतं होतं की भारतीय संघ इंग्लंडला तगडी टक्कर देईल. एका बाजूला नायडू सांभाळून खेळत होते तर दुसऱ्या बाजूला वजीर जबरदस्त फलंदाजी करत होते. पण 110धावा झाल्या असताना वजीर 31 धावांवर ब्राऊनच्या गोलंदाजीवर बाद झाले. थोड्या वेळानंतर कर्नल नायडू (40)रोबिन्स झेल देऊन बाद झाले. त्या सामन्यात कर्नल नायडू यांना क्षेत्ररक्षण करताना हाताला इजा झाली होती. पण तरीही ते पूर्ण सामन्यात धीराने उभे होते. हे दोघं बाद झाल्यावर तळाचे फलंदाज जास्त काही करू शकले नाहीत. 93षटकांत 189 धावांवर भारताचा डाव संपुष्टात आला .

इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात – 

सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव सुरू झाला. इंग्लंडला 70 धावांची आघाडी मिळाली होती. पण जहाँगीर खान यांनी दुसऱ्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांना जखडून ठेवलं होतं. त्यांनी सुरुवातीलाच होम्स 11धावा आणि वूली (21) यांना तंबूत पाठवलं होतं. या डावात त्यांना अमर सिंग यांनी चांगली साथ दिली. त्यांनी सटक्लिफला 19 धावांवर नायडुंच्या हाती झेलबाद केले. इंग्लंड संघ 67 धावात चार गडी गमावून पुन्हा एकदा अडचणीत आला होता. पण इंग्लिश कर्णधार जोर्डिन(85*) आणि पेंटर (54) यांनी डाव सावरला. दोघांनी अर्धशतक साजरे करत संघासाठी 275धावा उभ्या केल्या. इंग्लिश कर्णधाराने 275 धावांवर डाव घोषित केला आणि 70 धावांच्या आघाडीसह भारता समोर पहिलं कसोटी लक्ष्य 346 धावांचे उभं केलं.

भारतासमोर 346 धावांचे लक्ष्य – 

चौथ्या डावात 346 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात जास्त खराब झाली नाही. पहिला अधिकृत कसोटी सामना खेळणारे जनार्दन नवले आणि नौमल जौमल यांनी 41 धावांची भागीदारी केली. त्यानंतर वजीर यांनी पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करत 39 धावा केल्या. तर कर्णधार नायडू दुसऱ्या डावात फक्त 10 धावा करून बाद झाले. 83 धावापर्यंत निम्मा भारतीय संघ तंबूत परतला होता. त्यानंतर 108 धावसंख्येवर भारतीय संघाचे सात गडी बाद झाले. असं वाटत होतं की इंग्लिश संघ दोनशे धावांच्या फरकाने विजयी होईल पण नवव्या क्रमांकावर उतरलेल्या अमर सिंगनी एकटा किल्ला लढवत 51 धावांची अप्रतिम खेळी केली. ते भारतासाठी अर्धशतक करणारे पहिले फलंदाज बनले. इतकंच नाही तर त्यांच्या खेळीमुळे भारताचा डाव 187डावात संपुष्टात आला आणि भारताचा 158 धावांनी पराभव झाला.

पराभव होऊन सुद्धा ती ऐतिहासिक तारीख आहे

भलेही त्या सामन्यांत भारताचा पराभव झाला. पण त्या दौऱ्यात भारतीय संघाला बरेच प्रतिभावंत खेळाडू मिळाले. 1932च्या कसोटी पराभवाचा वचका कपिल देवच्या भारतीय संघाने पन्नास वर्षांनंतर याच मैदानावर तेही 25 जूनलाच विश्वचषक जिंकून घेतला. स्वातंत्र्यापूर्वी एकमेव सामान्य कर्णधाराच्या भारतीय संघाचा पहिला कसोटी पराभव झाला पण आजही त्या पराजयाची गोष्ट भारतीय क्रिकेटसाठी प्रेरणादायी आहे.

You might also like