विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांमध्ये १८ ते २३ जून दरम्यान पार पडला. या रोमांचक सामन्यात, दोन दिवसाचा खेळ हा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. अखेर राखीव दिवशी या सामन्याचा निकाल लागला. राखीव दिवशी न्यूझीलंड संघाने हा सामना ८ गडी राखून आपल्या नावावर करत इतिहास रचला.
या मोठ्या सामन्यात न्यूझीलंड संघाला विजय मिळवून देण्यात काइल जेमिसनने महत्वाची भूमिका बजावली. ज्यामुळे तो पहिल्यावहिल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. चला तर पाहूया, यापुर्वी कोण होते पहिल्यावहिल्या आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्काराचे मानकरी? (first players to get man of match awards in Inaugural ICC tournament)
१) क्लाइव्ह लॉयड (वेस्ट इंडिज) : (विश्वचषक स्पर्धा १९७५ विरुद्ध ऑस्ट्रेलिया)
विश्वचषक १९७५ च्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया हे बलाढ्य संघ सामने होते. वेस्ट इंडिज संघाची धावसंख्या ५० धावांवर ३ गडी बाद असताना क्लाइव्ह लॉयड फलंदाजी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी ८५ चेंडुंमध्ये १०२ धावांची तुफानी खेळी केली होती. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने १७ धावांनी विजय मिळवत विश्वचषकाला गवसणी घातली होती. याच खेळीच्या जोरावर त्यांना पहिल्यावहिल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
२) जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका): (चॅम्पियन्स ट्रॉफी १९९८ विरुद्ध वेस्ट इंडिज)
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या वहिल्या चॅम्पियन्स ट्रॉफी १९९८ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकन संघाने विजय मिळवला होता. या सामन्यात त्यांनी ४ विकेट्सने वेस्ट इंडिज संघाला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. हा सामना जिंकून देण्यात जॅक कॅलिसने मोलाचे योगदान दिले होते. कॅलिसने गोलंदाजी करताना ३० धावा देत ५ गडी बाद केले होते. तर फलंदाजी करताना ३७ धावांची खेळी केली होती. याच कामगिरीच्या जोरावर त्याला पहिल्या वहिल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
३) इरफान पठाण (भारत): (टी-२० विश्वचषक स्पर्धा २००७ विरुद्ध पाकिस्तान)
एमएस धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिली वहिली टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे संघ आमने सामने होते. या सामन्यात इरफान पठाणने फलंदाजी करताना नाबाद ३ धावा केल्या होत्या. परंतु गोलंदाजी करताना त्याने ४ षटकात अवघ्या १६ धावा खर्च करत ३ गडी बाद केले होते. याच कामगिरीच्या जोरावर त्याला पहिल्या वहिल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.
४) काइल जेमिसन (न्यूझीलंड): (विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२१ विरुद्ध भारत)
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पार पडलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने विजय मिळवला होता. या सामन्यात अष्टपैलू खेळाडू काइल जेमिसनने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याने दोन्ही डावात मिळून ७ गडी बाद केले होते. यामध्ये त्याने भारतीय संघातील मुख्य फलंदाजांना बाद करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. याच कामगिरीच्या जोरावर त्याला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या वहिल्या अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या-
टेलरचा विजयी चौकार अन् न्यूझीलंडचा जल्लोष, वॉटलिंगची निवृत्ती; WTC फायनलचे भावूक करणारे अंतिम क्षण
पदार्पणापासूनच भारताला नडणाऱ्या जेमिसनची ‘अशी’ राहिली कसोटी चॅम्पियनशीमधील कामगिरी