भारतीय संघासाठी नुकताच पार पडलेला इंग्लंड दौरा समाधानकारक राहिला. दौऱ्याच्या सुरुवातील भारताने मागच्या वर्षी कोरोनाच्या कारणास्तव रद्द केलेला कसोटी सामना पुन्हा खेळला. इंग्लंडने हा कसोटी सामना जिंकला, परंतु त्यानंतर खेळल्या गेलेल्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
इंग्लंडविरुद्धची टी-२० आणि एकदिवसीय या दोन्ही मालिका भारताने १-२ अशा अंतराने नावावर केल्या. आगामी काळात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवार भारतीय संघाचे हे प्रदर्शन पाहून चाहते आनंदी आहेत. आपण या लेखात अशा पाच खेळाडूंची माहिती घेणार आहोत ज्यांनी इंग्लंड दौरा गाजवला आहे आणि टी-२० विश्वचषकातही ते महत्वाचे भूमिका पार पाडू शकतात.
सूर्यकुमार यादवने संपवला चौथ्या क्रमांकाचा पेच –
इंग्लंडविरुद्ध खेळताना भारताचा ३१ वर्षीय फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला. उभय संघातील टी-२० मालिकेत खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांमध्ये सूर्यकुमारने १७१ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याच्या एका शतकाचाही समावेश होता. सामन्यात त्याने ज्या आक्रमकतेसह फलंदाजी केले, ते पाहून प्रत्येकजण हैराण आहे. विशेष म्हणजे क्रमांक ४ वर खेळताना त्याने अशा पद्धतीचे प्रदर्शन केले आहे. चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमारचे दमदार प्रदर्शन पाहून कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही नक्कीच आनंद झाला असावा.
हार्दिक पंड्याने भरली संघातील अष्टपैलू कमतरता –
मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषका अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) खूपच खराब फॉर्ममध्ये दिसला होता. परंतु त्यानंतर त्याने काही काळ विश्रांती घेतली आणि स्वतःची फिटनेस पुन्हा मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. आयपीएल २०२२ मध्ये जोरदार पुनरागमन करणाऱ्या हार्दिकने इंग्लंड दौरा चांगलाच गाडवला. उभय संघातील टी-२० आणि नंतर एकदिवसीय मालिकेत हार्दिकने चार विकेट्सचा हॉल घेतला. अलीकडच्या काळात त्याच्या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली असून आगामी टी-२० विश्वचषकातही भारतासाठी तो चमदार कामगिरी करेल, अशी अपेक्षा सर्वांनाच आहे.