क्रिकेटच्या खेळात प्रत्येक खेळाडूची एक वेगळी भूमिका असते. मग तो फलंदाज असो वा गोलंदाज, तो आपल्या कामगिरीने संघाला यश मिळवून देत असतो. तशाच प्रकारे क्रिकेटमध्ये एका खेळाडूने फलंदाजीत आणि गोलंदाजीत एकत्रितपणे केलेली कामगिरी म्हणजे अष्टपैलू कामगिरी. याच अष्टपैलू कामगिरीला क्रिकेटमध्ये खूपच विशेष महत्व असते. कारण अष्टपैलू खेळाडू या दोन्ही भूमिकांमुळे संघासाठी कोणत्याही परिस्थितीवेळी उपयुक्त ठरू शकतो.
क्रिकेट विश्वात जेव्हा जेव्हा अष्टपैलू खेळाडूंबद्दल बोलले जाते, तेव्हा काही मोठ्या अष्टपैलू खेळाडूंचा उल्लेख आवर्जून केला जातो. मग त्यात रिचर्ड हेडली, इयान बोथम, कपिल देव, जॅक कॅलिस किंवा इम्रान खान असे खेळाडू येतात. क्रिकेटमध्ये या अष्टपैलू खेळाडूंचे स्थान खूप मोठे आणि उच्च आहे.
त्याचप्रमाणे, जेव्हा गेल्या काही वर्षांमधील अष्टपैलू खेळाडूंचा विचार केला तर असे बरेच चांगले अष्टपैलू खेळाडू तयार झाले आहेत. तर या लेखात गेल्या १० वर्षात वनडेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंबद्दल जाणून घेऊया….
गेल्या १० वर्षातील वनडे क्रिकेटमधील ५ सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू…
१. रवींद्र जडेजा
माजी कर्णधार कपिल देव यांनी भारतीय क्रिकेट संघामध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून बरीच वर्ष महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कपिल देव यांच्यानंतर भारतीय संघात नेहमीच अष्टपैलू खेळाडूची उणीव भासत होती. आतपर्यंत कोणताही अष्टपैलू खेळाडू या कमतरतेची पूर्तता करू शकला नसला, तरी गेल्या १० वर्षांपासून रवींद्र जडेजाने भारतीय क्रिकेटमध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.
रवींद्र जडेजा १० वर्षांहून अधिक काळ भारतीय संघासाठी खेळत आहे. त्याने गोलंदाजीत आणि फलंदाजीत संघासाठी शानदार योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. रवींद्र जडेजाने बऱ्याचदा ७ व्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे, परंतु गेल्या १० वर्षांत वनडे क्रिकेटमध्ये त्याने जवळपास २००० धावा केल्या आणि गोलंदाजीत त्याने १७० बळी घेतले आहेत.
२. बेन स्टोक्स
इंग्लंड क्रिकेट संघामध्ये अँड्र्यू फ्लिंटॉफचे अष्टपैलू खेळाडू म्हणून मागील १० वर्षांपूर्वी खूप नाव होते. अँड्र्यू फ्लिंटॉफच्या निवृत्तीनंतर इंग्लंड संघाला निश्चितच अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता होती, जो त्याच्या कामगिरीने गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही भूमिकेत उत्कृष्ट कामगिरी बजावेल. त्यानंतर इंग्लंड संघाला बेन स्टोक्सच्या रुपाने जबरदस्त अष्टपैलू खेळाडू मिळाला.
बेन स्टोक्सने आपल्या अष्टपैलू कौशल्यांनी क्रिकेट जगाला दाखवून दिले की भविष्यातील तो एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू बनू शकतो. स्टोक्सने इंग्लंडकडून सातत्याने चांगली कामगिरी केली असल्याने संघासाठी तो एक अत्यंत महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. वनडे क्रिकेटमध्ये गेल्या १० वर्षात स्टोक्सने ९५ वनडे सामने खेळले, त्यात २६८२ धावा केल्या तर त्याने ७० बळीही मिळवले.
३. मोहम्मद हफीझ
पाकिस्तान क्रिकेट संघात अष्टपैलू खेळाडूंची जास्त कमतरता जाणवली नाही. कारण या संघाला अब्दुल रझाक आणि शाहिद आफ्रिदी यांनी एकत्र खेळत बरीच वर्ष संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका यशस्वीपणे बजावली. त्यानंतर मोहम्मद हाफिजनेही संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका निभावण्यात कोणतीही कसर सोडली नाही.
मोहम्मद हाफिज हा मुख्यातः फलंदाज असला तरी त्याने आपल्या फिरकी गोलंदाजीनेही चांगली कामगिरी केली आहे. हाफिज हा पाकिस्तान संघासाठी खूप उपयुक्त खेळाडू आहे. गेल्या १० वर्षांत आपल्या अष्टपैलू कामगिरीने त्याने वेगळी छाप पाडली. २०१० पासून आतापर्यंत हफीझने वनडेत फलंदाजीमध्ये ५,५०० हून अधिक धावा केल्यात तर गोलंदाजीत १०० पेक्षा अधिक बळीही घेतले आहेत.
४. अँजेलो मॅथ्यूज
श्रीलंकेच्या क्रिकेट संघात नेहमीच अष्टपैलू खेळाडूची कमतरता जाणवली आहे. परंतु, सनथ जयसूर्याने मधल्या काळात ही कमी पूर्ण केली. त्याने बऱ्याचदा गोलंदाजी आणि फलंदाजीद्वारे आपली चमक दाखवली होती. परंतु त्याच्या निवृत्तीनंतर अँजेलो मॅथ्यूजने ही जबाबदारी मोठ्या प्रमाणात पार पाडली.
आज अँजेलो मॅथ्यूजची कारकीर्द संपण्याच्या दिशेने असली, तरी त्याने त्याच्या अष्टपैलू कामगिरीने संघाला खूप मदत केली आहे. मॅथ्यूज हा फलंदाज अष्टपैलू खेळाडू होता, परंतु त्याने गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. मॅथ्यूजच्या अखेरच्या १० वर्षाच्या काळात अष्टपैलू कामगिरीकडे पाहता त्याने वनडेत ५००० हून अधिक धावा केल्या तर १०० पेक्षा जास्त बळीही आपल्या नावावर केले आहेत.
५. शाकिब अल हसन
सध्याच्या अष्टपैलू खेळाडूंचा विचार केला तर त्यात अनेक खेळाडू असू शकतात. पण जर तीनही प्रकारातील प्रभावी कामगिरी पाहिली, तर बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनचे नाव प्रथम येते. आपल्या अष्टपैलू कामगिरीने शाकिब अल हसनने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
फलंदाज आणि गोलंदाज म्हणून त्याने क्रिकेटच्या सर्व स्वरूपात दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. शाकिब अल हसनचा अखेरचा दहा वर्षांचा अष्टपैलू म्हणून अनुभव पाहता तो सर्वात यशस्वी ठरला आहे. त्याने गेल्या १० वर्षात १३१ वनडे सामन्यात आपल्या नावावर ४ हजाराहून अधिक धावा केल्यात तर १७० हून अधिक बळीही मिळवले आहेत.
ट्रेंडिंग लेख –
६ युवा खेळाडू जे यावर्षी २०२० आयपीएलमध्ये करू शकतात पदार्पण…
रोहित-विराटला मागे टाकून आयपीएलमध्ये सर्वाधिक सरासरीने धावा करणारे हे ५ फलंदाज…
सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळणारे ३ दिग्गज भारतीय क्रिकेटपटू
महत्त्वाच्या बातम्या –
‘दादा’च्या ‘त्या’ एका फोनवर मिळाली गरीब कुटुंबाला मदत; झाली कोरोना चाचणी
आयर्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर, ४ वर्षांनी दिग्गज खेळाडू करतोय कमबॅक
ICC वर्ल्ड कप सुपरलीग: फ्रंटफूट नोबॉलवर असणार थर्ड अंपायरची करडी नजर, पहा आयसीसीचे नवे नियम