इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ९ एप्रिलपासून या स्पर्धेला शुभारंभ होणार आहे. तसेच ३० मे रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये चेन्नई येथे रंगणार आहे.
आयपीएल सुरू होऊन १३ वर्ष पूर्ण झाले आहेत. तसेच ही स्पर्धा आता १४ व्या वर्षात पदार्पण करत आहे. अशातच या १३ वर्षांमध्ये अनेक अशा घटना घडल्या आहेत, ज्यामुळे खेळाडूंवर निर्बंध देखील लावण्यात आले होते. चला तर पाहूया ५ असे क्रिकेटपटू ज्यांच्यावर विविध कारणांमुळे आयपीएलमध्ये बंदी लावण्यात आली होती.
१) मोहम्मद आसिफ : आयपीएलची सुरुवात २००८ साली झाली होती. पहिल्या हंगामात पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ याला दिल्ली संघाने आपल्या संघात स्थान दिले होते. परंतु दिल्ली आणि राजस्थान संघाच्या सामन्यापूर्वी खेळाडूंची युरीन चाचणी करण्यात आली होती. यामध्ये मोहम्मद आसिफच्या अहवालात ड्रग्सचे सेवन केल्याचे आढळून आले होते. यानंतर त्यावर एक वर्षासाठी निर्बंध लावण्यात आले होते. यासोबतच त्याला संघातून बाहेर काढण्यात आले होते.
२) हरभजन सिंग : आयपीएल २००८ मध्ये हरभजन सिंग मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधीत्व करत होता. या हंगामात त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. साखळी सामन्यांमध्ये, किंग्ज इलेव्हन पंजाब संघासोबत सामना झाल्यानंतर हरभजन सिंगने हाथ मिळवत असताना श्रीसंतला कानाखाली वाजवली होती. या घटनेची तपासणी केली तेव्हा हरभजन सिंगवर आरोप लावण्यात आले होते. इतकेच नव्हे तर त्याला १ वर्षासाठी आयपीएल स्पर्धा खेळण्यापासून प्रतिबंध लावण्यात आले होते. तसेच त्याच्यावर पाच वनडे सामन्यांसाठी देखील निर्बंध लावण्यात आले होते.
३) एस श्रीसंत : आयपीएल २००८ मध्ये झालेल्या हरभजन सिंग आणि श्रीसंत यांच्या वादानंतर श्रीसंत अजून एका मोठ्या वादात अडकला होता. २०१३ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करत असताना तो स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकला होता. श्रीसंत व्यतिरिक्त आणखी २ खेळाडूंवर पैसे घेऊन नो बॉल टाकण्याचा आरोप लावण्यात आला होता. या घटनेची दखल घेत बीसीसीआयने श्रीसंतच्या खेळण्यावर आजीवन निर्बंध लावले होते. ६ ते ७ वर्ष चाललेल्या या केसचा निकाल अखेर लागला. श्रीसंत ने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे.
४) ल्यूक पॉमर्सबैक : आयपीएल २०१२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऑस्ट्रेलियन फलंदाज, ल्यूक पॉमर्सबैक ने २००८ पासून ते २०११ पर्यंत पंजाब संघासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याने आयपीएलच्या १७ सामन्यात ३०२ धावा केल्या होत्या. २०१२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळताना त्याच्यावर अमेरिकन नागरिकाने आरोप लावले होते. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली होती.यानंतर त्याच्या आयपीएल खेळण्यावर निर्बंध लावण्यात आले होते.
५) रवींद्र जडेजा : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने २००८ मध्ये राजस्थान रॉयल्स संघात प्रवेश केला होता. २००८ -०९चे हंगाम राजस्थान संघाकडून खेळलेल्या जडेजावर २०१० मध्ये एका संघाकडून खेळत असताना दुसऱ्या संघासोबत करार बाबत बोलणे सुरू होते.असे आरोप करण्यात आले होते. यामुळे २०१० मध्ये त्याच्या खेळण्यावर निर्बंध लावण्यात आले होते. त्यानंतर २०११ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याने कोची टस्कर्स केरला संघातून पुनरागमन केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल २८ वर्षांनंतर भारताला विश्वविजेता बनवणारे नायक सध्या करतात तरी काय? घ्या जाणून
‘या’ नवोदित शिलेदारांचे उजळणार नशीब, चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी पदार्पणाची मिळणार संधी?
रिषभने बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाला केलं ब्लॉक; आता पडलाय ‘या’ सौंदर्यवतीच्या प्रेमात!