१४३ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात आत्तापर्यंत ३०१३ खेळाडू किमान एक तरी कसोटी सामना खेळले आहे. यातील अनेक खेळाडूंनी कसोटी बरोबरच वनडे सामनेही खेळले. त्यातील अनेक क्रिकेटपटूंना या दोनही प्रकारात चांगला समतोल राखता आला तर अनेक खेळाडू कोणत्यातरी एकाच प्रकारापुरते मर्यादीत राहिले.
या लेखातही अशा ५ खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यांनी कसोटीमध्ये मोठे नाव कमावले मात्र त्यांची वनडे कारकिर्द फारशी बहरली नाही. किंवा त्यांना वनडे संघातून युवा खेळाडूंना संधी मिळावी म्हणून अचानक वगळण्यात आले.
१. जेम्स अँडरसन –
इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनची गणना कसोटीतील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये होते. तो कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारा चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत १५१ कसोटी सामन्यात ५८४ विकेट्स घेतल्या आहेत. पण कसोटीत एक यशस्वी गोलंदाज असला तरी वनडेतील त्याची कारकिर्द अचानक संपुष्टात आली.
त्याची वनडे कारकिर्द २०१५ च्या विश्वचषकात संपुष्टात आली. त्याला त्या विश्वचषकात केवळ ५ विकेट्स घेता आल्या. त्यानंतर तो इंग्लंडच्या संघाकडून वनडेत खेळला नाही. त्याने वनडेत १९४ सामन्यात २९.२२ च्या सरासरीने २६९ विकेट्स घेतल्या आहेत.
विशेष म्हणजे अँडरसनची वनडे कारकिर्द कसोटीपेक्षा लवकर संपली असली तरी तो इंग्लंडकडून कसोटीत आणि वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.
२. ऍलिस्टर कूक –
इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूकला कसोटीतील अव्वल फलंदाजांमध्ये गणले जाते. कसोटीत सर्वात कमी वयात १० हजार धावा करणाऱ्या कूकची वनडे कारकिर्द मात्र तितकी यशस्वी ठरली नाही.
त्याने जून २००६मध्ये मॅंचेस्टर वनडेने कारकिर्दीची सुरुवात केली. वनडेत ३६.४०ची ठिकठाक सरासरी व ७७.१३चा स्ट्राईक रेट असलेल्या या खेळाडूला केवळ ९२ वनडे सामने खेळता आले. त्याने शेवटचा वनडे सामना कोलंबोला श्रीलंकेविरुद्ध २०१४साली खेळला.
तो २०१५ चा वनडे विश्वचषक खेळेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र त्याला त्याआधीच वनडेतील खराब फॉर्ममुळे इंग्लंडच्या वनडे संघाच्या कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आले. त्यानंतर तो इंग्लंडकडून एकही वनडे सामना खेळला नाही.
३. व्हीव्हीएस लक्ष्मण –
भारताचा दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणनचे नाव कसोटीतील दिग्गज फलंदाजांमध्ये सन्मानाने घेतले जाते. त्याने कसोटीत अनेक मोठे पराक्रम केले आहे. १९९६ ला कसोटीत पदार्पण केलेल्या लक्ष्मणने २०१२ पर्यंत १३४ कसोटी सामने खेळताना ४५.९७ च्या सरासरीने ८७८१ धावा केल्या.
मात्र त्याची वनडे कारकिर्दीत जेमतेम ८६ वनडे सामन्यापर्यंतच मर्यादीत राहिली. तसेच त्याला कधी विश्वचषकातही खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याचबरोबर २००५-०६ च्या दरम्यान युवा खेळाडूंनी भारताच्या वनडे संघात स्थान पक्के करण्यास सुरुवात केल्यानंतर लक्ष्मण वनडेत मागे पडला.
त्याने वनडेत ३०च्या सरासरीने व ७१.२३च्या स्ट्राईक रेटने २३३८ धावा केल्या. यातही त्याने ६ शतके व १० अर्धशतके केली. तसेच शेवटचा वनडे सामना २००६ मध्ये खेळला. विशेष म्हणजे त्यानंतर तो पुढे ६ वर्षे कसोटी संघातील नियमित सदस्य होता. २०१२ ला त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
४. जस्टिन लँगर –
जस्टिन लँगर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंमधील एक नाव. त्यांनी कसोटीत सलामीवीर फलंदाज म्हणून मोठी कारकिर्द घडवली. त्यांनी १०५ कसोटी सामने खेळताना त्यांनी ४५.२७ च्या सरासरीने ७६९६ धावा केल्या. त्यांनी आणि मॅथ्यू हेडनसह अनेक मोठ्या भागीदाऱ्या केल्या.
मात्र वनडेमध्ये त्यांना केवळ ८ सामने खेळण्याचीच संधी मिळाली. यात त्यांना एकही अर्धशतक करता आले नाही. त्यांनी केवळ १६० धावा वनडेत केल्या. त्यांनी १९९७ ला शेवटचा वनडे सामना खेळला. या सामन्यानंतर त्यांनी १० वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. या १० वर्षात ते ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे नियमित सदस्य होते.
५. माईक आर्थरटन –
इंग्लंड संघाचा कर्णधार राहिलेल्या अर्थरटनने १९८९ ते २००१ या १२ वर्षात आपली क्रिकेट कारकिर्द घडवली. १२ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने ११५ कसोटी सामने खेळले. यात त्याने ३७.६९ च्या सरासरीने ७७२८ धावा केल्या.
पण कसोटीत कारकिर्द बहरली असली तरी त्याची वनडे कारकिर्द जेमतेम ८ वर्षांची राहिली. यात त्याने केवळ ५४ वनडे सामने खेळले. त्याचा वनडेचा स्ट्राईक रेट हा ५८.६४ हा बऱ्यापैकी खराब राहिला. तो एकप्रकारे या झटपट क्रिकेट प्रकाराशी कधीच जुळवून घेऊ शकला नाही. १९९८ ला तो त्याच्या वनडे कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला.
ट्रेंडिंग लेख –
एका टी२० सामन्यात सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारे ५ फलंदाज
पदार्पण व निवृत्तीच्या कसोटी सामन्यात शानदार शतकं करणारे ३ खेळाडू, १ आहे भारतीय
एकाच दिवसात दोन वेळा पुर्ण टीम बाद होण्याच्या ४ घटना