आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी२० हा सर्वात वेगवान क्रिकेट प्रकार आहे. या प्रकारात खेळताना आक्रमक खेळण्याचाच फलंदाचा प्रयत्न असतो. त्यामुळे या प्रकारातील सामने चाहत्यांना अधिक रोमांचक वाटतात. त्यात केवळ साडेतीन-चार तासात एक सामना संपत असल्याने चाहतेही हे सामने पहाण्यात अधिक रस घेतात.
अशा वेळी गोलंदाजांवर अधिक दबाव असतो. कारण कमी कालावधीत हा सामना संपत असल्याने त्यांना प्रत्येक चेंडू उत्तम टाकण्याचा प्रयन्त करावा लागतो. त्यातही टी२० क्रिकेटमुळे शेवटच्या षटकात जरी १० पेक्षा अधिक धावांची विजयासाठी गरज असल्यास फलंदाज आत्मविश्वासाने फलंदाजी करु लागले आहेत.
पण असे असले तरी काही असेही गोलंदाज आहेत, ज्यांनी शेवटच्या षटकात दबावाखालीही उत्तम गोलंदाजी प्रदर्शन करुन आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. अशाच भारताकडून गोलंदाजी करताना टी२०मध्ये शेवटच्या षटकात जबरदस्त गोलंदाजी करुन विजय मिळवून देणाऱ्या ५ गोलंदाजांचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
१. बरिंदर स्त्रान – विरुद्ध झिम्बाब्वे, हरारे, २०१६
२२ जून २०१६ला झिम्बाब्वे विरुद्ध भारत संघात ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील शेवटचा सामना झाला होता. दोन्ही संघ मालिकेत १-१ने बरोबरीवर होते. तिसऱ्या टी२० सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यावेळी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताने केदार जाधवच्या ५८ धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ६ बाद १३८ धावा केल्या होत्या आणि झिम्बाब्वेला १३८ धावांचे आव्हान दिले होते.
या आव्हानाचा पाठलाग करत असताना झिम्बाब्वेला शेवटच्या षटकात २१ धावांची आवश्यकता होती. यावेळी बरिंदर स्त्रानच्या पहिल्या चेंडूवर झिम्बाब्वेचा फलंदाज टिमीसेन मारुमाने षटकार मारला. त्यानंतरचा चेंडू वाइड ठरला आणि त्यापुढील चेंडू नो बॉल गेला. पण या नो बॉलरही मारुमाने चौकार मारला. पण यानंतर स्त्रानने पुन्हा चांगले पुनरागमन करत पुढील २ चेंडू निर्धाव टाकले. दिली नाही. पण चौथ्या चेंडूवर मारुमाने एक धाव घेतली.
त्यामुळे झिम्बाब्वेला २ चेंडूत विजयासाठी ८ धावांची गरज होती. यावेळी फलंदाजीस आलेल्या चिंगबुराने ५व्या चेंडूवर चौकार मारला. पण, स्त्रानने लो फुलटॉस टाकलेल्या शेवटच्या चेंडूवर चिंगबुरा झेलबाद झाला आणि भारताने ३ धावांनी ती मालिका खिशात घातली.
२. जोगिंदर शर्मा – २००७ विश्वचषक अंतिम सामना
२४ सप्टेंबर २००७ ला १२ वर्षांपूर्वी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत झालेला पहिला वहिला टी20 विश्वचषक जिंकला होता. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ धावांनी पराभूत करत टी२० चे विश्वविजेतेपद मिळवले होते.
या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती, तर भारताला १ विकेटची. त्यावेळी भारताचा कर्णधार एमएस धोनीने जोगिंदर शर्माकडे शेवटच्या षटकात गोलंदाजीसाठी चेंडू सोपवला.
या षटकात जोगिंदरने पहिल्याच दोन चेंडूत ७ धावा दिल्या. त्यामुळे पाकिस्तानला जिंकण्यासाठी ४ चेंडूत ६ धावा असे समीकरण झाले होते आणि पाकिस्तानकडून फलंदाजी करत होता मिस्बाह उल हक.
यावेळी जोगिंदरने तिसरा चेंडू लेंथमध्ये बदल करत आणि कमी गतीने टाकला आणि ४३ धावांवर खेळणाऱ्या मिस्बाहने त्यावर स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण फाइन लेगला उभ्या असणाऱ्या एस श्रीसंथने त्याचा झेल घेतला.
या विकेटसह भारताने विश्वचषकही जिंकला. या षटकानंतर जोगिंदर करोडो भारतीयांसाठी हिरो ठरला होता.
३. जसप्रीत बुमराह – इंग्लंड विरुद्ध, नागपूर, २०१७
२९ जानेवारी २०१७ला नागपूर येथे भारत विरुद्ध इंग्लंड संघात ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना झाला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ८ बाद १४४ धावा केल्या होत्या. यात केएल राहूलच्या ७१ धावांचा समावेश होता.
भारताने दिलेल्या १४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना इंग्लंडच्या जो रूट आणि बेन स्टोक्सने प्रत्येकी ३८ धावांचे योगदान दिले होते. शेवटच्या षटकात इंग्लंडला ८ धावा करायच्या होत्या. यावेळी जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. तसेच रुट ३८ धावांवर आणि बटलर १८ धावांवर खळत होता. यावेळी बुमराने शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रुटला बाद केले.
त्यानंतर फलंदाजी करण्यास आलेल्या मोईन अलीने १ धाव काढत बटलरला स्ट्राईक दिली. बटलरला तिसऱ्या चेंडूवर धाव काढता आली नाही. बुमराहने चौथ्याच चेंडूवर बटलरला त्रिफळाचीत केले. त्यामुळे इंग्लंडसमोर २ चेंडूत ७ धावा असे समीकरण झाले होते. त्याच्या पुढच्या २ चेंडूवर बुमराहने केवळ १ धाव दिली त्यामुळे भारताने ५ धावांनी हा सामना जिंकला.
४. मोहम्मद शमी – विरुद्ध न्यूझीलंड, हॅमिल्टन, २०२०
जानेवारी-फेब्रुवारी २०२० मध्ये न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात ५ सामन्यांची टी२० मालिका झाली होती. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने निर्धारित २० षटकात ५ बाद १७९ धावा केल्या होत्या आणि न्यूझीलंडला १८० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी ९ धावांची गरज होती. यावेळी भारताकडून शमी गोलंदाजी करत होता.
या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रॉस टेलरने षटकार मारला. त्याच्या पुढच्या चेंडूवर एकेरी धाव निघाली. त्यामुळे न्यूझीलंडसमोर २ धावा ४ चेंडू असे समीकरण होते. पण याचवेळी शमीने उत्कृष्ट गोलंदाजी करत केन विलियम्सनला तिसऱ्या चेंडूवर ९५ धावांवर असताना बाद केले. तर पुढच्या दोन चेंडूत १ धाव शमीने दिली आणि शेवटच्या चेंडूवर टेलरला त्रिफळाचीत केले.
त्यामुळे न्यूझीलंडलाही निर्धारित २० षटकात ६ बाद १७९ धावा करता आल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत भारताने हा सामना जिंकला होता.
५. हार्दिक पंड्या – २०१६ टी२० विश्वचषक, विरुद्ध बांगलादेश
-२०१६ टी२० विश्वचषकात भारत विरुद्ध बांगलादेश संघात निर्णायक सामना झाला होता. या सामन्यात भारताने १ धावेने विजय मिळवला होता. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात ११ धावांची गरज होती आणि भारताकडून हे षटक हार्दिक पंड्या टाकत होता.
बांगलादेशकडून या षटकाच्या पहिल्या चेंडूवर महमुद्दुलाहने १ धाव घेतली. त्यामुळे फलंदाजीसाठी मुशफिकूर रहीम स्ट्राईकवर आला. त्याने पुढच्या २ चेंडूवर २ चौकार ठोकले.
त्यावेळी बांगलादेशला ३ चेंडूत २ धावांची गरज होती. पण उत्साहाच्या भरात मोठा फटका खेेळताना रहिम झेलबाद झाला. त्याच्या पुढच्याच चेंडूवर महमुद्दुलाह देखील झेलबाद झाला. तर शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना मुस्तफिजूर रेहमान धावबाद झाला आणि भारतीय संघाने १ धावेने विजय मिळवला.
ट्रेंडिंग लेख –
ओपनिंग पासून ते ११व्या नंबरपर्यंत फलंदाजी करणारे ३ महान फलंदाज, एक आहे भारतीय
शेवटच्या चेंडूवर ६ धावा हव्या असताना खणखणीत षटकार मारणारे २ खेळाडू
१० मधल्या फळीतील असे फलंदाज, जे पुढे जाऊन बनले स्फोटक सलामीवीर