लहानपणी जवळजवळ आपण सर्वचजण अनेक गोष्टी ऐकत असतो. त्यातील अनेक गोष्टी खऱ्या असतात तर काही खोट्या. क्रिकेटबद्दलही आपण अशा अनेक गोष्टी ऐकल्या असतील, ज्यानंतर खोट्या असल्याचे किंवा त्यात काही तथ्य नसल्याचे आपल्याला आढळले असेल.
अशाच क्रिकेटबद्दलच्या काही खोट्या गोष्टी ज्या लहानपणी आपण ऐकल्या आहेत –
१. तू आत्ता एक विश्वचषक सोडला आहेस – स्टिव्ह वॉ
१९९९ ला झालेल्या विश्वचषकात सुपर सिक्स फेरीतील ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात निर्णायक सामना झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजय मिळून उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी २७१ धावांचे आव्हान होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ४८ धावा अशी बिकट होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह वॉ फलंदाजीला आला. तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा हर्षल गिब्स त्याला म्हणाला ‘पाहू हा किती दबाव झेलू शकतो.’ पण वॉने चांगली फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला.
त्यातच वॉ ५६ धावांवर असताना एक सोपा झेल मिड-विकेटला उभ्या असणाऱ्या गिब्सने सोडला आणि वॉला जीवदान मिळाले. त्या जीवदानाचा फायदा घेत वॉने शतक करत ऑस्ट्रेलियाला विजयही मिळवून दिला.
त्यानंतर आपण ऐकल्याप्रमाणे वॉ गिब्सला म्हणाला, ‘मित्रा, तू आत्ता एक विश्वचषक सोडला आहेस.’ पण नंतर गिब्सनेच खूलासा केला की वॉ त्याला असे काही म्हणाल्याचे त्याने ऐकलेले नाही. तर वॉ म्हणाला, ‘अशा गोष्टीवर लोक लगेचच विश्वास ठेवतात, हे किती गमतीशीर आहे.’
२. एकाच चेंडूवर केल्या २८६ धावा –
एकाच चेंडूवर २८६ धावा केल्याचे आपण ऐकले असेल. १८६५ च्या एका इंग्लिश वृत्तपत्रानुसार वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि विक्टोरिया यांच्यात बनबरी येथे एक सामना झाला होता. या सामन्यात विक्टोरिया संघाने प्रथम फलंदाजी केली.
यावेळी पहिल्याच चेंडूवर फलंदाजाने मोठा फटका खेळला. त्यामुळे चेंडू उंच झाडांच्या फांद्यामध्ये जाऊन अडकला. जे झाड मैदानातच्या आवारातच होते. पण त्यावेळी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चेंडू हरवल्याचे अपिल केले. पण पंचांना चेंडू दिसत असल्याने त्यांनी हे अपिल फेटाळले. या कालावधीत विक्टोरियाचे फलंदाज ६ किलोमीटर धावले आणि त्यांनी २८६ धावा केल्या.
पण या सामन्यात असे काही झाल्याचा पुरावा नसल्याने ही गोष्ट खोटी असल्याचे मानले जाते.
३. धोनी रोज ५ लिटर दूध पितो –
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते त्यावेळी सुरुवातीचे काही वर्षे तो त्याच्या आक्रमक फटकेबाजीमुळे प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे त्याच्याबद्दल काही अफवाही पसरल्या होत्या, त्यातील एक म्हणजे तो रोज ५ लिटर दूध पितो आणि त्याचमुळे त्याच्यामध्ये मोठे फटके खेळण्याची ताकद येते.
पण स्वत: धोनीनेच स्पष्ट केले की तो १ लिटर दूधही क्वचित पिऊ शकतो. त्यामुळे त्याच्याबद्दलची ५ लिटर दूध पिण्याची गोष्ट ही अफवा आहे.
४. २००३ मध्ये पाँटिंगने वापरलेल्या बॅटमध्ये स्प्रिंग होती –
२००३ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात रिकी पाँटिंगने भारताविरुद्ध १२१ चेंडूत १४० धावांची खेळी केली होती. त्यावेळी त्याच्या बॅटमध्ये स्प्रिंग असल्याचे म्हटले जात होते. तसेच त्याआधीही कुकाबुरा कंपनीने बनवलेल्या त्याच्या बॅटला कार्बन ग्रॅफाईट स्ट्रिप लावलेली असायची, अशीही चर्चा झाली.
त्यानंतर अनेक वर्षांनी आयसीसी आणि एमसीसीने पाँटिंगच्या बॅटवर निर्बंध लावले असल्याचेही ऐकण्यात आले. पण वास्तविक पाँटिंगची यात कोणतीही चूक नसल्याचे लक्षात आले आणि या सर्व केवळ आफवा असल्याचेही स्पष्ट झाले.
५. एबी डिविलियर्स अनेक खेळ उच्च स्तरावर खेळला आहे –
दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक माजी फलंदाज एबी डिविलियर्सने त्याच्या लहानपणी क्रिकेट, रग्बी, टेनिस, फुटबॉल, हॉकी, बॅटमिंटन असे अनेक खेळ खेळले असल्याचे आपण ऐकले आहे. पण याबद्दल ‘एबी: द ऍटोबायोग्राफी’ या त्याच्या आत्मचरित्रात खूलासा केला आहे की तो यातील अनेक खेळ उच्चस्तरावर खेळलेला नाही.
त्याने त्यात सांगितले आहे की तो हॉकी शाळेत असताना १ वर्षे खेळला पण त्याची पुढच्या स्तरावर निवड झाली नाही. तसेच तो बॅडमिंटन कधीही शाळेतही खेळलेला नाही. त्याचबरोबर तो रग्बीमध्येही कधी उच्च स्तरावर खेळलेला नाही. त्यामुळे तो अनेक खेळ खेळला असल्याच्या अफवा आहेत, हे स्पष्ट झाले.