आयपीएल 2024 चा अंतिम सामना आज (26 मे) कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा जेतेपदाचा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जाईल. या मैदानावर अनेकदा अत्यंत रोमांचक सामने होतात. त्यामुळे आजचा सामना देखील शेवटच्या षटकापर्यंत जावा, अशी चाहत्यांची इच्छा आहे.
या बातमीद्वारे जाणून घ्या, या सामन्यात कोणते 5 खेळाडू कहर करू शकतात आणि आपल्या संघाला सामना जिंकून देऊ शकतात. या खेळाडूंमध्ये सुनील नारायण, ट्रॅव्हिस हेड आणि आंद्रे रसेलसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
1) सुनील नारायण – कोलकाता नाइट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू सुनील नारायण त्याच्या संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तसंच त्याची विकेट घेणं हे हैदराबादसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. जर हैदराबादचा संघ त्याला लवकर थांबवू शकला नाही, तर नारायण कोलकाताला एकहाती सामना जिंकवून देऊ शकतो. तो या हंगामातील सर्वात मौल्यवान खेळाडू आहे. अशा स्थितीत पॅट कमिन्सचा संघ सुनील नारायणविरुद्ध कोणती रणनीती आखतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
2) ट्रॅव्हिस हेड – या ऑस्ट्रेलियन सलामीवीरानं सनरायझर्स हैदराबादला नवं बळ दिलं आहे. डेव्हिड वॉर्नर गेल्यापासून संघ सलामीला संघर्ष करत होता, पण हेडनं येताच सर्वकाही बदलून टाकलं. तो एकदा ठोकायला लागला, की त्याला रोखणं खूपच अवघड होऊन जातं. या हंगामात त्यानं 192 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटनं 567 धावा ठोकल्या आहेत. अशा परिस्थितीत तो केकेआरसाठी मोठी समस्या बनू शकतो.
3) आंद्रे रसेल – आंद्रे रसेल केकेआरच्या टीमचा कणा आहे. त्याला रोखणं हैदराबादसाठी अडचणीचं ठरेल, कारण तो फलंदाजी आणि गोलंदाजीतही आपलं योगदान देतो. आजच्या सामन्यात कोलकाताला त्यांच्या या स्टार खेळाडूकडून त्याच्या सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असेल. आयपीएलच्या या हंगामात रसेलनं 222 धावा केल्या आहेत आणि 16 विकेट्स घेतल्या आहेत.
4) हेनरिक क्लासेन – ज्याप्रमाणे रसेल हा केकेआरचा कणा आहे, त्याचप्रमाणे हेनरिक क्लासेन हैदराबादच्या संघासाठी आहे. एकदा का क्लासेननं खेळपट्टीवर जम बसवला, की त्याला रोखणं अशक्य होतं. जर तो मोठा डाव खेळण्यात यशस्वी झाला तर सनरायझर्सला जिंकण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. त्यानं या हंगामाच्या 14 सामन्यात 463 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 176 पेक्षा जास्त राहिला. यावरून तो किती धोकादायक खेळाडू आहे हे लक्षात येतं.
5) वरुण चक्रवर्ती – अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीची कामगिरी पाहण्यासारखी असेल. आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. या हंगामात त्यानं 20 विकेट्स घेतल्या आहेत. चेन्नईच्या खेळपट्टीवर नेहमी फिरकीपटूंचं वर्चस्व असतं. त्यामुळे आज वरुण चक्रवर्ती आणि हैदराबादच्या मधल्या फळीतील लढत पाहण्यासारखी असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
विजेतेपद जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा वर्षाव! ऑरेंज अन् पर्पल कॅप मिळवणारे खेळाडूही होतील मालामाल
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहे का? पावसानं खोळंबा घातला तर कोणता संघ बनेल चॅम्पियन?
प्लेऑफमध्ये आरसीबीचा पराभव करणं पडतं महागात! समोर आला अनोखा योगायोग