भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ गुरुवारी (23 फेब्रुवारी) आमने सामने आले. आयसीसी महिला टी-20 विश्वचषक (ICC Womens T20 World Cup) 2023चा हा उपांत्य सामना होता. या सामन्यात भारतीय संघाला 5 धावांनी नजीकचा पराभव स्वीकारावा लागला. मात्र, भारतीय संघाच्या या पराभवाची कारणे नक्की काय राहिले याचा आपण आढावा घेऊया.
1. खराब क्षेत्ररक्षण-
भारतीय संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण ठरले संघाचे खराब क्षेत्ररक्षण. भारतीय संघाने अगदी पहिल्या षटकापासून मैदानी क्षेत्ररक्षण करताना अनेक धावा दिल्या. वाचवता येण्यासारख्या जवळपास 10-12 धावा भारतीय क्षेत्ररक्षकांनी ऑस्ट्रेलियाला बहाल केल्या. तसेच, शफाली वर्माने आक्रमक 31 धावा करणाऱ्या ऍश्ले गार्डनरचा अवघ्या पाच धावांवर झेल सोडला.
2. यष्टीरक्षक रिचा घोषने केलेल्या चुका-
विश्वचषकात आतापर्यंत भारतीय संघाची यष्टीरक्षक रिचा घोष ही उत्कृष्ट कामगिरी बजावताना दिसलेली. मात्र, या उपांत्य फेरीच्या सामन्यात तिच्याकडून अनेक क्षुल्लक चुका घडून आल्या. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंग केवळ एका धावेवर असताना तिने तिचा झेल सोडला. लॅनिंगने 49 धावांची नाबाद खेळी केली. तसेच, तिने यष्टीचित करण्याच्या दोन संधी देखील दवडल्या.
3. अपयशी सलामी जोडी-
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 173 या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताला चांगली सलामी मिळणे आवश्यक होते. मात्र, सलामीवीर शफाली वर्मा 6 चेंडूवर 9 व स्मृती मंधाना 5 चेंडूवर 2 धावा करत बाद झाली. त्यामुळे भारताच्या मध्य फळीवर मोठा दबाव आला.
4. हरमनप्रीत कौरचा बेजबाबदारपणा-
भारतीय संघ विजयाकडे आगेकूच करत असताना अर्धशतक पूर्ण करून खेळत असलेली कर्णधार हरमनप्रीत कौर निष्काळजीपणामुळे धावबाद झाली. दुसरी धाव घेत असताना ती अतिशय संथ पळताना दिसली. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक हिलीने चपळता दाखवत तिला बाद केले.
5. फिनिशिंगचा अभाव-
भारतीय संघाला अखेरच्या तीन षटकात 30 धावांची गरज होती. मात्र, दीप्ती शर्मा व स्नेह राणा या मोठे फटके खेळू शकल्या नाहीत. दोघींनी देखील 100 च्या आसपासच स्ट्राइक रेट राखल्याने भारताला लक्ष गाठणे अवघड झाले.
(Five Reasons Why India Womens Lost In T20 World Cup Semi Final Against Australia)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नेहमीप्रमाणे यावेळीही उपांत्य सामन्यात स्मृती मंधाना अपयशी, पाहा कसा आहे यापूर्वीचा रेकॉर्ड
आयसीसीने दिला नागपूर आणि दिल्ली खेळपट्टीला ‘रिमार्क’! भारतीय संघाला…