नुकताच भारतीय संघाने ३ टी२० सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड संघाचा ३-० ने धुव्वा उडवत मालिका आपल्या नावावर केली होती. आता हे दोन्ही संघ कसोटी क्रिकेटमध्ये दोन हात करणार आहेत. गेल्या ३ वर्षांचा इतिहास पाहिला, तर न्यूझीलंड संघाने आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाला अडचणीत टाकले आहे. परंतु, भारतात भारतीय संघाला पराभूत करणे कठीण आहे.
न्यूझीलंड संघ १९८८ पासून विजय मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु, या न्यूझीलंड संघातील ५ असे खेळाडू आहेत,जे भारतीय संघाला अडचणीत टाकू शकतात. चला तर जाणून घेऊया या खेळाडूंबद्दल अधिक माहिती.
१)केन विलियमसन
न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसन हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. तसेच तो उत्कृष्ट कर्णधार देखील आहे. तसेच केन विलियमसनला भारतात खेळण्याचा दांडगा अनुभव आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून तो आयपीएल स्पर्धा खेळतोय. त्यामुळे तो नक्कीच भारतीय गोलंदाजांच्या अडचणीत वाढ करू शकतो.
न्यूझीलंड संघ जेव्हा शेवटच्या वेळी भारतात आला होता, त्यावेळी कानपूर कसोटी सामन्यात केन विलियमसनने ७५ धावांची खेळी केली होती. यावर्षी झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केन विलियमसनने भारताविरुद्ध ४९ आणि नाबाद ५२ धावांची खेळी केली होती.
२) रॉस टेलर
न्यूझीलंड संघाचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर देखील भारतीय संघाला अडचणीत टाकू शकतो. त्याच्याकडे देखील भारतीय खेळपट्टीवर खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. त्याने यापूर्वी देखील २०१०, २०१२ आणि २०१६ मध्ये भारताचा दौरा केला आहे. रॉस टेलर हा असा फलंदाज आहे, जो खेळपट्टीवर टिकून राहण्यासोबतच जलद गतीने धावा देखील करतो. रॉस टेलरला कानपूरच्या खेळपट्टीवर खेळण्याचा अनुभव आहे.
३) टॉम लॅथम
न्यूझीलंड संघाचा सलामीवीर फलंदाज टॉम लॅथमवर देखील सर्वांचे लक्ष असणार आहे. टॉम लॅथमला धावा करण्यात यश येत आहे परंतु, तो शतक पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे. टॉम लॅथम जेव्हा भारताच्या दौऱ्यावर आला होता, त्यावेळी त्याने कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात ५८, कोलकाता कसोटीच्या दुसऱ्या डावात ७४ आणि इंदोर येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ५३ धावा केल्या होत्या.
४) एजाज पटेल
भारतीय खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळत असते. भारतीय मूळचा फिरकीपटू एजाज पटेल देखील त्याच फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे, जो या खेळपट्टीवर फलंदाजांना अडचणीत टाकू शकतो. एजाज पटेलच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने अवघ्या ९ सामन्यात २६ गडी बाद केले आहेत. त्यामुळे तो भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळणार, हे जवळ जवळ निश्चित आहे.
५) मिचेल सॅंटनर
मिचेल सॅंटनर देखील त्या फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे, जो भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकू शकतो. मिचेल सॅंटनरला देखील भारतातील खेळपट्टीवर खेळण्याचा चांगला अनुभव आहे. न्यूझीलंड संघ जेव्हा भारताच्या दौऱ्यावर होता, त्यावेळी मिचेल सॅंटनरने १० गडी बाद केले होते. न्यूझीलंड संघ या सामन्यात २ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. त्यामुळे मिचेल सॅंटनर आणि एजाज पटेलला संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
केव्हा, कुठे आणि कधी पाहू शकाल भारत – न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी? जाणून घ्या एका क्लिकवर
न्यूझीलंडचा ‘हा’ फिरकीपटू टीम इंडियाला आव्हान देण्यास सज्ज, मुंबईमध्ये झाला होता जन्म
भारताविरुद्ध कानपूर कसोटीत मोठी खेळी केली, तर केन विलियम्सन ‘या’ तीन दिग्गजांना टाकू शकतो मागे