जगातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय खेळ म्हणुन फुटबाॅलकडे पाहिले जाते तर क्रिकेट हा अनेक देशांत खेळला जाणार परंतु काही ठराविक देशांत प्रचंड लोकप्रिय असणारा खेळ अाहे.
भारतात क्रिकेटचा मोठा चाहता वर्ग आहे. अगदी या देशात या खेळाला धर्माची उपमा दिली जाते. असे असले तरी फूटबाॅलच्या लोकप्रियतेवरुन त्याचं मोठेपण मान्य केलंच पाहिजे.
जेवढे देश युनोमध्ये सहभागी नाहीत त्यापेक्षा जास्त देशांत फूटबाॅल खेळ खेळला जातो असे म्हटले जाते.
अशा या दोन लोकप्रिय खेळांमधील फक्त आकडेवारीच्या आधारावर केलेली ही तुलना-
या खेळात भाग घेणारे देश-
क्रिकेटच्या ३ पट जास्त देश फूटबाॅल विश्वचषकात भाग घेतात. त्यात स्पर्धेच्या पात्रता फेरीत फूटबाॅलमध्ये यावर्षी तब्बल २११ देशांनी भाग घेतला होता तर क्रिकेटमध्ये १० देशांनी भाग घेतला होता.
फूटबाॅल विश्वचषकात प्रत्यक्ष भाग घेणारे संघ ३२ तर २०१९च्या विश्वचषकात प्रत्यक्ष भाग घेणारे संघ आहेत १०.
टेलिव्हीजनवर सामना पहाणाऱ्यांची संख्या-
जर सर्वच माध्यमांचा विचार केला तर फूटबाॅलची व्हिवरशीप अर्थात विविध माध्यमातून सामना पहाण्यांची संख्या ही गेल्या विश्वचषकात ३.२ बिलीयन होती. तर २०१५ क्रिकेट विश्वचषकात ही आकडेवारी १.५ बिलीयन होती. फूटबाॅल विश्वचषक त्या प्रत्येक देशात दाखवला जातो ज्या देशातील संघाने पात्रता फेरी खेळली आहे. ही देशांची संख्या २००हुन अधिक आहे.
एक जर विचार केला तर कमी देश खेळत असतानाही एकप्रकारे क्रिकेटची व्हिवरशीप थोडीशी उजवी वाटते.
यजमान देश-
फिफा विश्वचषक आजपर्यंत २० वेळा झाला असुन त्यात १७ देशांनी तो आयोजीत केला आहे. त्यात जर्मनी, ब्राझील आणि इटली देशांनी तो दोनवेळा आयोजीत केला आहे. तर आयसीसी विश्वचषक आजपर्यंत ११ वेळा झाला आहे. त्यात इंग्लंडने आजपर्यंत ३ वेळा आयोजनाचा मान मिळवला आहे तर ११ पैकी ६ वेळा दोन किंवा अधिक वेळा मिळून याचे आय़ोजन केले आहे.
मिळणारे उत्पन्न-
दोन्ही विश्वचषकातून मिळणाऱ्या उत्पन्नाची तुलना करणे कठीण आहे. कारण क्रिकेट विश्वचषकापेक्षा तब्बल १०० पट जास्त उत्पन्न फिफाला विश्वचषकातून मिळते. वेगवेगळे राईट्स, प्रक्षेपण, तिकिटे आणि मार्केटिंमधून फिफाला ४८२६ मिलियन अमेरिकन डाॅलर तर क्रिकेट विश्वचषकातून आयसीसीला ४२.८ मिलियन अमेरिकन डाॅलर मिळतात.
विश्वचषक आयोजनात होणारा खर्च-
जसा फिफाला या आयोजनातून मोठ्या प्रमाणार पैसा उभा रहातो तसाच ते खर्चही करतात. २०१४ विश्वचषक आयोजनासाठी फिफाने तब्बल २२२४ मिलियन अमेरिकन डाॅलर खर्च केले होते तर २०१५ विश्वचषकात आयसीसीने १३.९ मिलियन अमेरिकन डाॅलर खर्च केले होते.
बक्षिस रक्कम-
फिफा विश्वचषक विजेत्यांना २०१४मध्ये तब्बल ३५ मिलियन अमेरिकन डाॅलर, उपविजेत्यांना २५मिलियन अमेरिकन डाॅलर तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला २२ मिलियन अमेरिकन डाॅलर मिळाले होते.
क्रिकेट विश्वचषकात विजेत्यांना २०१५मध्ये तब्बल ३.९७ मिलियन अमेरिकन डाॅलर, उपविजेत्यांना १.७५ मिलियन अमेरिकन डाॅलर तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला ०.६ मिलियन अमेरिकन डाॅलर मिळाले होते.
याचा अर्थ फूटबाॅल विश्वचषकात जो संघ साखळी फेरीतून बाहेर पडतो त्याला मिळणाऱ्या रकमेच्या अर्धीही रक्कम क्रिकेट विजेत्या संघाला मिळतं नाही.
तिकिटांचे दर-
क्रिकेट विश्वचषकाचे तिकिट हे फूटबाॅल विश्वचषकाच्या ५ पट स्वस्त आहे. यावर्षीच्या फिफा विश्वचषकाचे सर्वात स्वस्त तिकिट १०५ अमेरिकन डाॅलर आहे. तर २०१९ क्रिकेट विश्वचषकाचे सर्वात स्वस्त तिकिट २७ अमेरिकन डाॅलर आहे.
प्रत्यक्ष मैदानात येऊन सामना पहाणाऱ्यांची सरासरी-
तिकीट जरी महाग असले तरी प्रत्यक्ष मैदानात येऊन सामना पहाणाऱ्या प्रेक्षाकांची संख्या मात्र फूटबाॅलमध्येच जास्त आहे. २०१४ फिफा विश्वचषकात सरासरी ५३,५९२ प्रेक्षकांनी प्रत्येक सामन्याला हजेरी लावली होती. तर २०१५ क्रिकेट विश्वचषकात प्रत्येक सामन्याला सरासरी २१,२७१ प्रेक्षकांनी हजेरी लावली होती.
पर्यटन-
ज्या देशात कोणतीही खेळाची मोठी स्पर्धा असते त्या देशात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात त्यामुळे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतो. फिफा विश्वचषक २०१४मध्ये ब्राझील देशात तब्बल ६ लाख पर्यटकांनी भेटी दिल्या होत्या. हा विक्रम पुढे याच देशात झालेल्या आॅलिंपीकने मोडला. तर २०१५मध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या काळात १ लाख ४५ पर्यटकांनी आॅस्ट्रेलियाला भेट दिली होती.