मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने १५ नोव्हेंबर १९८९ ला कराची येथे पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी सचिनचे वय केवळ १६ वर्षे आणि २०५ दिवस एवढे होते. त्यामुळे तो भारतीय पुरुष संघाकडून कसोटीत पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला होता.
विशेष म्हणजे पुढे तो तब्बल ७ वर्षे भारताच्या कसोटी संघातील वयाने सर्वात लहान सदस्य होता. सचिननंतर अनेक खेळाडूंनी या ७ वर्षात कसोटी पदार्पण केले. यात अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, राहुल द्रविड, सौरव गांगुली, विनोद कांबळी, अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे. पण ते सर्व खेळाडू सचिनपेक्षा वयाने मोठे होते.
त्यामुळे सचिनला त्यांच्यापेक्षा जास्त सामने खेळण्याचा अनुभव असला तरी तो वयाने मात्र त्यांच्यापेक्षा लहान होता. अखेर ज्या दिवशी व्हीव्हीएस लक्ष्मणने भारताकडून कसोटी पदार्पण केले त्यावेळी सचिनच्या नावावरील हा विक्रम पुसला गेला. कारण लक्ष्मण हा सचिनपेक्षा वयाने लहान आहे.
लक्ष्मणने नोव्हेंबर १९९६ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबाद येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सचिनच्या कसोटी पदार्पणापासून ते लक्ष्मणच्या कसोटी पदार्पणापर्यंतच्या ७ वर्षांच्या कालावधीमध्ये भारताकडून तब्बल २२ खेळाडूंनी कसोटी पदार्पण केले होते. पण हे सर्व २२ खेळाडू सचिनपेक्षा वयाने मोठे होते.
नमुद करण्यासारखी गोष्ट अशी की या ७ वर्षांत भारतीय कसोटी संघातील सर्वात लहान सदस्य म्हणून सचिन तब्बल ४२ कसोटी सामने खेळला होता.
सचिनने २४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर नोव्हेंबर २०१३ ला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने या कालावधीत सर्वाधिक २०० कसोटी सामने खेळले. तसेच या २०० कसोटी सामन्यात त्याने ५३.७८ च्या सरासरीने सर्वाधिक १५९२१ धावा केल्या. Sachin remained the youngest member in Indian Test team For 7 years
ट्रेंडिंग घडामोडी –
अशी कमवते बीसीसीआय करोडो रुपये, म्हणून आहे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड
दादाच्या बॅटची काळजी घ्यायचा मास्टर ब्लास्टर सचिन
त्या क्रिकेटपटूची एक धाव पडली होती तब्बल ७ लाखांना