ऑस्ट्रेलियामध्ये सध्या महिला टी20 विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. या विश्वचषकात आज(5 मार्च) भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पहिला उपांत्य सामना रंगणार होता. मात्र हा सामना सुरु होण्याआधीपासून सिडनीमध्ये आज पाऊस सुरु होता. त्यामुळे हा सामना नाणेफेकही न होता रद्द झाला आहे.
त्यामुळे आयसीसीच्या नियमानुसार साखळी फेरीनंतर अ गटात अव्वल क्रमांकावर असणाऱ्या भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्याची भारतीय महिला संघाची ही पहिलीच वेळ आहे.
आयसीसीच्या नियमानुसार जर उपांत्य सामने रद्द झाले तर साखळी फेरीनंतर गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवणाऱ्या संघाचा अंतिम सामन्यात प्रवेश होता. त्यानुसार भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला. कारण भारताने साखळी फेरीनंतर अ गटातील सर्व सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवला होता.
मात्र या नियमामुळे इंग्लंड महिला संघाचे टी२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.
तसेच भारत-इंग्लंड सामन्यानंतर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता दक्षिण आफ्रिका महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ असा दुसरा उपांत्यपूर्व सामना सिडनी येथेच सुरु होणार आहे. पण जर या सामन्यादरम्यानही सिडनीत पावसाचा जोर कायम राहिला आणि हा सामना देखील रद्द झाला तर ब गटात साखळी फेरीनंतर अव्वल क्रमांक मिळवणारा दक्षिण आफ्रिका संघ अंतिम सामन्यात प्रवेश करेल.
महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना जागतिक महिला दिनाच्या दिवशी म्हणजेच ८ मार्चला मेलबर्न येथे होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–मोठ मोठे क्रिकेटपटूही विचारात पडले पण कारनामा तर पोलार्डने केला
–रोहित-कोहलीसह भारतीय क्रिकेटपटूंचे करियर आता या माजी खेळाडूच्या हाती
–गुजरातला पराभवाचा धक्का देत उनाडकटचा सौराष्ट संघ रणजीच्या फायनलमध्ये