भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना 23 जुलैपासून खेळला जाणार आहे. इंग्लंड सध्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे, त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंचा आत्मविश्वास खूप उंचावलेला आहे. लॉर्ड्सच्या सामन्यात इंग्लंड गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत भारताला 193 धावांचे लक्ष्य गाठू दिले नाही. जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) वेगवान माऱ्याच्या जोरावर एकूण 5 विकेट्स घेतल्या आणि भारताचा डाव थांबवला.
पण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर आर्चर नव्हे, तर क्रिस वोक्स (Khris woakes) भारतीय फलंदाजांसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरू शकतो.
क्रिस वोक्सला ओल्ड ट्रॅफर्डचं मैदान खूपच मानवतं. त्याने या मैदानावर आतापर्यंत 7 कसोटी सामने खेळले असून एकूण 35 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने दोन वेळा एका डावात 5 विकेट्सही घेतल्या आहेत. या मैदानावरील त्याची गोलंदाजी सरासरी फक्त 17.37 अशी राहिली आहे. म्हणूनच भारतीय फलंदाजांनी वोक्सकडून सावध राहणं गरजेचं आहे. गेल्या तीन सामन्यांत वोक्सने 7 विकेट्स घेतल्या आहेत, त्यामुळे त्याचा आत्मविश्वासही चांगलाच वाढलेला आहे.
ओल्ड ट्रॅफर्डच्या खेळपट्टीची जी पहिली झलक समोर आली आहे, त्यामध्ये खेळपट्टीवर खूपशी हिरवळ दिसत आहे, म्हणजेच वेगवान गोलंदाजांसाठी ही परिस्थिती पोषक ठरू शकते. पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये मुख्य फलंदाजांचे वर्चस्व दिसले, पण चौथा सामना निर्णायक ठरू शकतो.
भारताचे काही प्रमुख वेगवान गोलंदाज सध्या दुखापतीमुळे बाहेर आहेत आणि त्यामुळे भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमण थोडं कमजोर आहे. हे लक्षात घेऊन कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stocks) हिरव्या खेळपट्टीची मागणी केली असण्याची शक्यता आहे. तरी, पहिल्या तीन सामन्यांमध्येही सुरुवातीला हिरवळ असलेल्या खेळपट्टीवरच नंतर गवत कापण्यात आलं होतं. त्यामुळे अंतिम निर्णय खेळाच्या दिवशीच स्पष्ट होईल.






