आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना शनिवारी (दि. 14 ऑक्टोबर) नरेंद्र मोदी स्टेडिअम, अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. अशातच या मोठ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याच्याबाबत भारतीय माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने मोठे वक्तव्य केले आहे.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना इरफान पठाण (Irfan Pathan) याने केएल राहुल (KL Rahul) याला टोपणनाव दिले. तो म्हणाला, “मी त्याला केएल राहुल म्हणत नाही, तर त्याला क्लास म्हणतो. हे त्याचे टोपणनाव आहे, जे मला खूप आवडते. त्याचं 2.0 व्हर्जन आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. कारण, दुखापतीतून परतताना त्याने पाकिस्तानविरुद्ध ज्याप्रकारे शतक झळकावले, ते खूपच जबरदस्त होते. तो त्या सामन्यात खेळणार नव्हता. मला वाटते की, त्या खेळातून त्याला जाणवले की, जास्त तयारी केल्याने फायदा होणार नाही.”
“जेव्हा आम्ही त्याची मुलाखत घेतली, तेव्हाही त्याने हीच गोष्ट सांगितली. दुखापतीमुळे तो पाच-सहा महिने बाहेर होता आणि त्यामुळे त्याचा त्याला खूप फायदा झाला, असे मला वाटते. आता त्याला वाटते की, जे काही झाले ते झाले, मला माझ्या खेळाचा आनंद घ्यायचा आहे. आपण सध्या जुन्या केएल राहुलला पाहत आहोत असं मला वाटतंय,” असेही तो पुढे बोलताना म्हणाला.
राहुलबद्दल बोलायचं झालं, तर दीर्घ काळाच्या दुखापतीतून बाहेर आल्यानंतर, त्याने आशिया चषकात पुनरागमन केले. तसेच, परत येताच त्याने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त शतक झळकावले. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. तो सातत्याने उत्कृष्ट खेळी करत आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 97 धावांची नाबाद खेळी करून विश्वचषकातही संघाला पहिला विजय मिळवून दिला होता. (Former all-rounder reacts to cricketer KL Rahul ahead of India-Pakistan match says this)
हेही वाचा-
पाकिस्तानविरुद्ध ‘एवढ्या’ धावा करताच विराट घडवणार इतिहास, बनेल असा पराक्रम करणारा दुसराच भारतीय
जगातील सर्वात मोठ्या स्टेडिअममध्ये पाकिस्तानविरुद्ध भिडणार भारत; रोहितही म्हणाला, ‘आमच्या खेळाडूंना…’