भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात शनिवारी (दि. 02 सप्टेंबर) पाऊस व्हिलन ठरला. आशिया चषक 2023 स्पर्धेतील या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने 266 धावांची समाधानकारक धावसंख्या उभारली होती. मात्र, पाकिस्तानची फलंदाजी करण्याची वेळ आली, तेव्हा पावसाने एन्ट्री केली. त्यानंतर खेळ सुरू झाला नाही. त्यामुळे दोन्ही संघांच्या परस्पर संमतीने सामना रद्द घोषित करण्यात आला. या सामन्यानंतर भारतीय संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाण याने ट्वीट करत पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली. आता त्याचे ट्वीट सर्वांचे लक्ष वेधत आहे.
इरफान पठाणचे ट्वीट
भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामना जेव्हाही होतो, तेव्हा संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष या सामन्यावर असते. यावेळी जर पाकिस्तान संघ पराभूत झाला, तर चाहत्यांना राग अनावर होतो आणि ते वेगवेगळ्या मार्गांनी आपला राग व्यक्त करतात. याचबद्दल इरफान पठाण (Irfan Pathan) याने विधान केले. 38 वर्षीय इरफान ट्वीट (एक्स) करत लिहिले, “आज खूप साऱ्या शेजाऱ्यांचे टीव्ही वाचले.”
Bahot saare Padosiyon ke TV bach gaye aaj;)
— Irfan Pathan (@IrfanPathan) September 2, 2023
चाहत्यांच्या मजेशीर कमेंट्स
इरफानच्या या पोस्टवर भारतीय चाहत्यांसोबतच पाकिस्तानी चाहत्यांनीही कमेंट्सचा पाऊस पाडला. एका युजरने लिहिले की, “टीव्हीसोबतच संपूर्ण संघाची इज्जतही… नाहीतर बिचारे लपून-छपून आपल्या देशात गेले असते.” दुसऱ्या एकाने लिहिले, “नाही सर आम्ही 266 धावा डिफेंड केल्या असत्या.”
टीवी के साथ पूरी टीम की इज्जत भी वरना बेचारी छुप-छुप कर अपने देश में जाते
— AIMIM (HUQ KI AWAAZ) (@aimimhuqkiawaaz) September 2, 2023
भारतासाठी किशन-पंड्या चमकले
पाकिस्तानविरुद्धचा सामना पावसाच्या नावावर गेला असला, तरीही भारतीय डावादरम्यान ईशान किशन (Ishan Kishan) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांची बॅट चांगलीच तळपली. दोघांनीही पाचव्या विकेटसाठी 138 धावांची शतकी भागीदारी रचली. तसेच, भारतीय संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. यावेळी पाचव्या स्थानी उतरलेल्या किशनने 81 चेंडूत 82 धावांचे योगदान दिले, तर सहाव्या स्थानी उतरलेल्या पंड्याने 90 चेंडूत 87 धावांची खेळी साकारली.
पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज चमकले. शाहीन आफ्रिदीने 10 षटके गोलंदाजी करत 35 धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या. एवढेच नाही, तर पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज नसीम शाह आणि हॅरिस रौफ यांनीही प्रत्येकी 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या.
आता भारतीय संघाचा पुढील सामना 4 सप्टेंबर रोजी नेपाळविरुद्ध कँडी येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. (after the ind vs pak match was cancelled irfan pathan post goes to viral see here)
हेही वाचा-
‘मैत्री बाहेर ठेवायची…’, IND-PAK खेळाडूंना चेष्टा-मस्करी करताना पाहून भडकला गंभीर, वाचाच
रोहित-विराटसह भारतीय संघाच्या फलंदाजांना गावसकरांनी सुनावले, म्हणाले ‘श्रेयस…’