बहुप्रतिक्षित वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेपूर्वी अनेक दिग्गज खेळाडूंनी विजेत्या, अंतिम सामन्यात आमने-सामने असणाऱ्या संघांविषयी भविष्यवाणी केली आहे. आता यामध्ये आणखी एक नाव जोडले गेले आहे. भारतीय संघाचा माजी दिग्गज अष्टपैलू युवराज सिंग याने अशा संघांची नावे सांगितली आहेत, जे विश्वचषक 2023 स्पर्धेतील उपांत्य सामने खेळू शकतात. मात्र, युवराजने 4 ऐवजी 5 संघांचा उल्लेख केला आहे. त्याच्या मते दक्षिण आफ्रिका संघ यावेळी स्पर्धेत हैराण करू शकतो. खरं तर, या संघाने आजपर्यंत कधीच विजेतेपद पटकावले नाहीये.
युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या मते, भारत (India), ऑस्ट्रेलिया (Australia), न्यूझीलंड (New Zealand) आणि इंग्लंड (England) हे 4 संघ उपांत्य सामन्यात प्रवेश करण्याचे प्रबळ दावेदार आहेत. मात्र, दक्षिण आफ्रिकेलाही दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही. या संघाने अलीकडेच मायदेशात ऑस्ट्रेलिया संघाला 3-2ने पराभूत केले आहे. दक्षिण आफ्रिका संघाने या 5 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन्ही सामने गमावले होते. मात्र, नंतर जबरदस्त पुनरागमन करत धमाल केली.
काय म्हणाला युवराज?
विश्वचषक 2011मध्ये भारतीय संघाला विजेतेपद जिंकून देण्यात युवराजने मोलाचा वाटा उचलला होता. तो मालिकावीरही ठरला होता. माध्यमांशी बोलताना युवराज म्हणाला, “भारत, ऑस्ट्रेलिया उपांत्य सामन्यात असतील. मी पाच संघ निवडेल. कारण, विश्वचषकात नेहमी उलटफेर होतो. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि मला वाटते की, दक्षिण आफ्रिका हैराण करू शकतो. त्यांना मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ट्रॉफीची गरज आहे.”
भारताचा 41 वर्षीय माजी अष्टपैलू युवराजला सध्याच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंविषयी विचारले गेले, तेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श, भारताचा रवींद्र जडेजा आणि इंग्लंडच्या बेन स्टोक्स याचे नाव घेतले. युवराजने स्टोक्सला सर्वोत्तम अष्टपैलू म्हटले. तो म्हणाला, “खूप अष्टपैलू आहेत. मिचेल मार्श, रवींद्र जडेजा आणि बेन स्टोक्स. स्टोक्स सध्या अव्वलस्थानी आहे. इंग्लंडने विश्वचषकासाठी त्याला परत बोलावले आहे.”
विशेष म्हणजे, स्टोक्सने विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी वनडे क्रिकेटमधील निवृत्ती मागे घेतली आहे. त्याने 2019च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला चॅम्पियन बनवण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. (former all rounder yuvraj singh picks these 4 teams as india australia new zealand and england world cup 2023 semi finalists)
हेही वाचा-
वर्ल्डकपसाठी समालोचकांची मांदीयाळी, दिग्गज क्रिकेटपटू पसरवणार आपल्या आवाजाची जादू; पाहा यादी
‘माझी प्लेइंग 11मधून अचानक हाकालपट्टी केली…’, भारताविरुद्ध न खेळवल्याबद्दल पाकिस्तानी खेळाडूचे मोठे विधान