क्रिकेटविश्वात एकाहून एक सरस गोलंदाज होऊन गेले आणि आजही आहेत. क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच गोलंदाजांमध्ये एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी स्पर्धा सुरू असते. आधुनिक क्रिकेटमध्येही असे अनेक गोलंदाज आहेत, जे आपल्या भेदक माऱ्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. बऱ्याचदा माजी क्रिकेटपटू सर्वश्रेष्ठ गोलंदाजाबाबत आपली मते मांडत असतात. अशातच इयान चॅपल यांनीही क्रिकेटविश्वातील ५ सर्वोत्कृष्ट गोलंदाजांची निवड केली आहे.
माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू इयान चॅपल यांनी आपल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजांच्या यादीत तीन भारतीय गोलंदाजांना स्थान दिले आहे. यामध्ये आर अश्विन, ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. मात्र भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची निवड केली नाही. तसेच त्यांनी पॅट कमिन्स आणि कगीसो रबाडा यांना देखील आपल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजांच्या यादीत स्थान दिले आहे. तसेच इयान चॅपल यांनी दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन यालाही आपल्या सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत स्थान दिले नाहीये.
इयान यांनी भारतीय फिरकीपटू आर अश्विन आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नाथन लायन यांची तुलना देखील केली आहे. यामध्ये त्यांनी अश्विन श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे. इयान म्हणाले की, “माझ्यामते अश्विन लायनपेक्षा श्रेष्ठ आहे. लायनचा स्ट्राइक रेट पाहा. तुम्ही ७० व्या दशकाविषयी बोलत आहात आणि मी २०१८ च्या दृष्टीने पाहात आहे.”
२०१८ पासून लायनने २७ कसोटी सामन्यात ७२.५ च्या सरासरीने ११३ गडी बाद केले आहेत. दरम्यान त्याला ६ वेळेस पाच गडी बाद करण्यात यश आले आहे. तसेच जर भारतीय संघाविरुद्धची कामगिरी पाहिली तर त्याचा स्ट्राइक रेट ८५.८ चा होता, जी त्याची सर्वात खराब कामगिरी होती.
अश्विन एक उत्कृष्ट गोलंदाज – इयान चॅपल
इयान चॅपल यांनी क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “माझ्या मते जेव्हा लायन डाव्या हाताच्या फलंदाजाला गोलंदाजी करतो, तेव्हा ऑन साईडच्या दिशेने जास्त धावा येतात. लायन एक चांगला गोलंदाज आहे. परंतु अश्विन त्याच्यापेक्षा श्रेष्ठ गोलंदाज आहे. लायनने ऑस्ट्रेलियासाठी १०० कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याला ३९९ गडी बाद करण्यात यश आले आहे. तर अश्विनने ७८ कसोटी सामन्यात ४०९ गडी बाद केले आहेत. लायनने भारतीय संघाविरुद्ध झालेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ९ गडी बाद केले होते. अश्विनला परदेशात साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. याचे कारण असे की त्याला परदेशात नेहमी दुखापतीमुळे संघाबाहेर राहावे लागले आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “माझ्या मते भारतीय गोलंदाजी आक्रमण खूप मजबूत आहे. अश्विन नुकताच इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज होता. त्याने सर्वाधिक गडी बाद केले. यासोबतच मालिकावीर पुरस्कार देखील पटकावला होता.”
इयान चॅपेल यांंच्यासह संजय मांजरेकर यांनी पॅट कमिन्स, जेम्स अँडरसन, जोश हेजलवुड, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना सर्वोत्कृष्ट गोलंदाजांच्या यादीत निवडले आहे. तसेच आकाश चोपडा यांनी दोन भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनसह पॅट कमिन्स, जोश हेजलवुड आणि न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज नील वॅगनर याची निवड केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
संधीची प्रतिक्षा! इंग्लंड दौऱ्यावर संधी न मिळालेला गोलंदाज म्हणतोय, ‘आता श्रीलंका दौऱ्याची आस’
रहाणेच्या चपळ क्षेत्ररक्षणामागे चक्क मुंबई लोकलचा हात, स्वत: उपकर्णधारानेच केला होता गौप्यस्फोट
कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामन्यात ‘या’मुळे विराट-रोहित येणार अडचणीत; दिग्गजाचे भाष्य