मुंबई । बांगलादेशचा डावखुरा फिरकीपटू मुशर्रफ हुसेन हा कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्हआढळला आहे. त्याने पाच वनडे सामन्यांमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्याला गेल्या वर्षी ब्रेन ट्यूमर झाल्याचेही निदान झाले होते. रविवारी कोविड -१९ चाचणीचा निकाल आल्यानंतर हुसेनला क्वारंटाइन केले आहे.
‘द डेली स्टार’ने हुसेनच्या हवाल्याने सांगितले की, ‘माझे वडील कोविड -१९ पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांना सीएमएच हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये दाखल केले होते. नंतर मलाही काही लक्षणांचा अनुभव आला आणि कोरोना व्हायरस टेस्टमध्ये पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले. मी आतापर्यंत ठीक आहे आणि घरी माझ्यापासून अलिप्त राहत आहे. माझी पत्नी व मुले निगेटिव्ह आढळले आहे.’
माजी कर्णधार मुशरफी मुर्तजा तसेच इतर दोन बांग्लादेशी क्रिकेटपटू नजमुल इस्लाम आणि नफीस इक्बाल हे जूनमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले होते. मागील आठवड्यात बांगलादेश फुटबॉल संघाच्या 18 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती.