भारतीय संघाचा माजी गोलंदाज अजित आगरकर याच्याविषयी मोठी बातमी समोर येत आहे. आगरकरने भारताच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीत सामील होण्यासाठी अर्ज केल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयने 22 जून रोजी जाहिरात काढून पुरुष निवड समितीतील रिकाम्या पदासाठी आमंत्रित केले होते. निवड समितीचे शेवटचे अध्यक्ष राहिलेल्या चेतन शर्मा यांनी पदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद रिकामे आहे. विशेष म्हणजे, एका न्यूज चॅनेलच्या स्टिंग ऑपरेशननंतर चेतन शर्मा यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी गुरुवारी (दि. 29 जून) रोजी शेवटच्या तारखेच्या एक दिवस आधीच अर्ज केला होता. 45 वर्षीय आगरकर निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार असेल. त्याने भारताकडून 26 कसोटी सामने आणि 191 वनडे सामने खेळले आहेत. त्याची निवड झाली, तर समितीत वेस्ट झोनमधून दोन निवडकर्ते असतील, ज्यात सलील अंकोला हे या झोनमधील दुसरे निवडकर्ता असतील. इतर तीन निवडकर्त्यांमध्ये शिव सुंदर दास, एस शरथ आणि शुब्रतो बॅनर्जी यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, आगरकर आयपीएल फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाच्या प्रशिक्षण स्टाफचा भाग होता. मात्र, गुरुवारी दिल्लीनेच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून घोषणा केली की, आगरकर आणि शेन वॉटसन त्यांच्यापासून वेगळे होत आहेत. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, आगरकरने 2017 ते 2019 यादरम्यान देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईच्या निवडकर्त्यांच्या अध्यक्षाच्या रूपात काम केले आहे.
क्रिकेट सल्लागार समिती 1 जुलैपासून मुलाखतीला सुरुवात करेल आणि ऑगस्ट महिन्यात आशिया चषक 2023 पूर्वी निर्णय देण्याची शक्यता आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, बीसीसीआयने मुख्य निवडकर्त्याच्या वार्षिक वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, या पदासाठीची मानकं पूर्ण करणाऱ्या माजी खेळाडूंना समालोचन आणि स्टुडिओतील क्रिकेट तज्ज्ञाच्या कामातून त्यांना अधिक पैसे मिळत असल्यामुळे ते या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक नव्हते.
खरं तर, बीसीसीआय निवड समितीच्या अध्यक्षाला एक कोटी रुपये पगार मिळायचा. तसेच, इतर सदस्यांना 90 लाख रुपये पगार मिळायचा. (former cricketer ajit agarkar applies for vacant position in india mens selection committee)
महत्वाच्या बातम्या-
महिला सीपीएल खेळणारी पहिली भारतीय खेळाडू; टीम इंडियाकडून खेळण्याआधी श्रेयांका पाटीलला संधी
BREAKING: ड्रीम 11 बनला टीम इंडियाचा मुख्य प्रायोजक, चार वर्षांसाठी छातीवर लागणार लोगो