जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हा १८ – २२ जूनमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याकडे संपुर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची उत्सुकता आहे. भारतीय संघ आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये कुणाला संधी देईल, यावर चर्चा होताना दिसत आहेत. अगदी चाहत्यांपासून ते माजी दिग्गज खेळाडूंपर्यंत सर्वजण यावर व्यक्त होत आहेत. आता भारताचे माजी क्रिकेटपटू व माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांनीही यावर आपले मत मांडले आहे. त्यांनी भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या संघातील समावेशाबद्दल मोठे भाष्य केले आहे.
रवींद्र जडेजाचे २ .० रूप हे सर्वानाच माहित आहेच. त्याने उत्कृष्ट गोलंदाजीसह एक विश्वासू फलंदाज म्हणून स्वतःला तयार केले आहे. जेव्हा भारताने २०१८ साली इंग्लंड दौरा केला होता, तेव्हा जडेजाला पहिल्या ४ सामन्यात भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नव्हती. या ४ पैकी ३ सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. जडेजाला मालिकेतील द ओव्हलला खेळवल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात स्थान मिळाले होते. भारताने ती मालिका गमावली होती, परंतु जडेजाने आपल्यातील प्रतिभेचे चांगले उदहारण दिले होते. त्याने पाचव्या सामन्यात एकूण ८ विकेट्स आणि पहिल्या डावात ८२ धावांची खेळी केली होती.
रवींद्र जडेजा आहे भारतीय संघाची संपत्ती
इंग्लंडसोबतच्या त्या शेवटच्या सामन्यानंतर जडेजाचे आंतराष्ट्रीय कारकिदीमध्ये एक नवीन अध्याय सुरु झाला होता. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पहिले नाही. मागील ३ वर्षात रवींद्र जडेजाच्या फलंदाजीची सरासरीही ५५.५७ने वाढली आहे. जर भारतीय संघाने शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी एक चौथा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला खेळवण्याचा निर्णय घेतला तर जडेजाचे संघात स्थान मिळवणे अवघड होईल. कारण, रविचंद्रन अश्विन हा भारतीय संघाचा मुख्य फिरकीपटू आहे. त्यामुळे जडेजाचे संघात खेळणे अवघड वाटते. परंतु, भारतीय संघाचा माजी खेळाडू व प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांना पूर्ण विश्वास आहे की भारतीय संघाच्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजाचे स्थान निश्चित असेल.
गायकवाड यांनी हिंदुस्थान टाइम्स सोबत बोलताना सांगितले की, “रवींद्र जडेजाला अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी देणे गरजेचे आहे. तो खेळाडू संघासाठी तिघी विभागांमध्ये मोठी संपत्ती आहे. तो ‘ट्रिपल प्लस’ आहे. रविचंद्रन अश्विन एक उत्कृष्ट फिरकीपटू आहे परंतु संघात जडेजाला त्याच्यासोबत खेळणे आवश्यक आहे. किती आंतराष्ट्रीय संघांकडे डाव्या हाताचे फिरकीपटू आहे? फक्त एक फिरकीपटू म्हणून नाही तर एक विश्वासू फलंदाज आणि एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून जडेजा संघात काम करतो. तुम्हाला एखाद्या खेळाडूकडून अजून काय पाहिजे?”
भारताला कमी लेखणे न्यूझीलंड संघाची सर्वात मोठी चुक असेल – गायकवाड
भारतीय संघाच्या मजबुतीबद्दल बोलताना गायकवाड म्हणाले, ‘न्यूझीलंडने जरी इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवले असले तरीही भारतीय संघाचा मागील २ कसोटी मालिकेतील खेळ पाहून त्यांना दुर्लक्षित करणे ही मोठी चूक असेल. ‘
भारतीय संघाने मंगळवारी १५ सदस्यांच्या संघाची सामन्यासाठी घोषणा केली आहे. त्यात रोहित व शुबमनलाही संधी देण्यात आली आहे. गायकवाड यांनी रोहित शर्मा व भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
चेतेश्वर पुजाऱ्याच्या हळू खेळण्यावर केले भाष्य
विराट कोहलीसह चेतेश्वर पुजाराही जागतिक कसोटी चॅम्पियनशिप व इंग्लंड विरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघासाठी एक महत्त्वाचा खेळाडू आहे. पुजारा ज्या वेगाने धावा बनवतो, हा खूप चर्चचा विषय राहिला आहे. भारतीय संघातील तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या पुजाऱ्याने वर्षाच्या सुरवातीच्या बॉर्डर-गावस्कर चषकमध्ये २९.२० च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे त्याने संघातील महत्त्वाच्या खेळाडूची जबाबदारी पार पडली होती.
गायकवाड यांनी पुजाराबद्दल बोलताना सांगितले, “दर प्रत्येक खेळाडू हा सचिन तेंडुलकर, विराट कोहली किंवा रोहित शर्मा असू शकत नाही. खेळपट्टीवर थांबून त्याने अनेकदा त्याच्या संथ सुरुवातीला मोठ्या खेळींमध्ये बदलले आहे. ज्यामुळे अनेकदा भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आले आहे. तुम्हाला अश्याच एका खेळाडूची गरज असते, जो फलंदाजी दरम्यान एका बाजूला टिच्चून फलंदाजी करेल तसेच तो विकेटही पडू देणार नाही. मला माहित आहे कि तो हळू गतीने धावा करतो. परंतु, कसोटी क्रिकेटमध्ये तुम्हाला अशाच एका खेळाडूची गरज असते. पुजारा अंतिम सामन्यात भारतासाठी एक महत्वपूर्ण काम करेल.”
महत्वाच्या बातम्या
कशी झाली होती रितिकासोबत भेट अन् काय होती युवराजची धमकी? रोहित शर्माने केला उलगडा
अखेर अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी केला विवियन रिचर्ड्स यांच्याबरोबरच्या प्रेमकथेचा खराखुरा उलगडा
फिनिक्स भरारी! पहिल्या डावात केवळ १५ धावांवर ऑलआऊट होणाऱ्या संघाने तब्बल १५५ धावांनी मिळवला विजय