---Advertisement---

‘वेगाचा बादशाह’ डेल स्टेनही झाला ईशांतच्या गोलंदाजीचा फॅन; म्हणाला, ‘मी आतापर्यंत कधीच…’

On: बुधवार, मे 3, 2023 3:39 PM
Dale-Steyn-And-Ishant-Sharma
---Advertisement---

मंगळवारी (दि. 2 मे) दिल्ली कॅपिटल्स संघाने गुजरात टायटन्सला 5 धावांनी पराभूत केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडिअममध्ये पार पडलेल्या सामन्यात दिल्लीने 130 धावांच्या कमी धावांच्या आव्हानाचा यशस्वीरीत्या बचाव केला. एकेवेळी दिल्लीची धावसंख्या 5 बाद 23 इतकी होती. मोहम्मद शमी याने 4 विकेट्स घेत दिल्लीची दाणादाण उडवली होती. त्यानंतर अक्षर पटेल आणि अमन खान यांनी मिळून दिल्लीचा डाव सांभाळला. अमनने या स्पर्धेतील पहिले अर्धशतक साकारले. विशेष म्हणजे, दिल्लीचे गोलंदाज या सामन्यात भलतेच चमकले. त्यांच्या गोलंदाजांनी गुजरातच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारूच दिली नाही.

दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना गुजरातपुढे 131 धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्ली कॅपिटल्स संघाला सामना जिंकण्यासाठी लवकर विकेट्स घेण्याची गरज होती. अशात ईशांत शर्मा, एन्रीच नॉर्किया आणि खलील अहमद यांनी गुजरातला सलग धक्के दिले. पाच षटकात गुजरातची धावसंख्या 3 विकेट्स गमावत 26 इतकी होती. यावेळी दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनने ईशांत शर्माचे कौतुक केले.

यातील एक विकेट ईशांत शर्मा (Ishant Sharma) याने  आपल्या नावावर केली होती. त्याने नकल बॉलने विजय शंकर याला बाद केले होते. त्याने फलंदाज विजयच्या दांड्या गुल केल्या. ईशांतच्या चेंडूवर विजयला काहीच करता आले नाही. चेंडू विजयच्या बॅटला चकवत थेट स्टंप्सला जाऊन लागला.

दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn) याने ईशांत शर्मा याची प्रशंसा केली. स्टेन सनरायझर्स हैदराबाद (Sunriser Hyderabad) संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. ईशांतचा हा चेंडू पाहून तो स्वत:ला त्याचे कौतुक करण्यापासून रोखू शकला नाही. स्टेनने ट्वीट करत लिहिले की, “ओके, ईशांतने विकेट घेणारा सर्वोत्तम नकल चेंडू टाकला आहे. मी यापेक्षा चांगला नकल चेंडू पाहिला नाही.”

गुजरात टायटन्स संघाला अखेरच्या षटकात 12 धावा करायच्या होत्या. गुजराकडून राहुल तेवतिया आणि हार्दिक पंड्या हे झुंज देत होते. यापूर्वी तेवतियाने नॉर्कियाच्या षटकात सलग 3 षटकार मारले होते. मात्र, ईशांतने त्याला बाद केले. तसेच, संघाला सामना जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. (former cricketer dale steyn praised ishant sharma for bowled vijay shankar in gt vs dc in ipl 2023)

ईशांतची गोलंदाजी
ईशांतने यादरम्यान 4 षटके गोलंदाजी करताना 23 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या. यामध्ये एक विकेट विजय शंकरची, तर दुसरी विकेट ही राहुल तेवतिया याची होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दिल्लीविरुद्ध केलेल्या घातक वेगवान गोलंदाजीबाबत शमीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘मी माझ्या…’
विराटने खरंच नवीनला दाखवला बूट? व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हीच ठरवा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---