आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडला गेला. मात्र, या संघातून युझवेंद्र चहल याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. अशात, भारतीय निवडकर्त्यांनी घेतलेला हा निर्णय चाहत्यांपासून ते माजी दिग्गज खेळाडूंपर्यंत कुणालाच पचत नाहीये. चहलची मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आकडेवारी दमदार राहिली आहे. त्याला संघाबाहेर केल्यामुळे प्रत्येकाला धक्का बसला आहे. अशात आता भारतीय संघाचा माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग यानेही चहलकडे दुर्लक्षित केल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. हरभजनच्या मते, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चहलचा हात कुणीच पकडू शकत नाही.
चहलला बाहेर केल्याने संतापला ‘भज्जी’
‘भज्जी’ या नावाने प्रसिद्ध असलेला हरभजन सिंग (Harbhajan Singh) आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेसाठी युझवेंद्र चहल (Harbhajan Singh) याला न निवडल्याने संतापला आहे. त्याने भारतीय निवडकर्त्यांवर आगपाखड केली आहे.
एका युट्यूब चॅनेलशी बोलताना हरभजन म्हणाला की, “मला वाटते की, या संघात एक सर्वात मोठी कमतरता दिसत आहे, ती युझवेंद्र चहलचे नसणे आहे. एक लेग स्पिनर चेंडूला दुसरीकडे वळवू शकतो. जर तुम्ही चांगल्या फिरकीपटूंबद्दल बोलता असाल, तर मला वाटत नाही की, भारतात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चहलपेक्षा चांगला कुणी फिरकीपटू आहे. होय, त्याचे अलीकडचे काही सामने चांगले राहिले नाहीत, पण त्यामुळे त्याला वाईट गोलंदाज म्हणता येणार नाही.”
विश्वचषकात मिळाली पाहिजे चहलला जागा
हरभजननुसार, चहलला वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) संघात जागा मिळाली पाहिजे. तो म्हणाला की, “मला वाटते की, तो संघात असणे गरजेचे आहे. मी अशी आशा करतो की, त्याच्यासाठी विश्वचषकाचे दरवाजे बंद झाले नसतील. कारण, स्पर्धा भारतात होणार आहे. चहल सिद्ध करून बसला आहे की, तो किती मोठा मॅचविनर आहे. मी समजू शकतो की, त्याचा फॉर्म चांगला नाहीये. त्यामुळे तुम्ही त्याला विश्रांती दिली असेल. मात्र, तो संघात असायला पाहिजे होता. कोणताही खेळाडू जेव्हा संघातून बाहेर पडल्यानंतर पुनरागमन करतो, तेव्हा त्याच्यावर दबाव असतो.”
चहलची वनडे कारकीर्द
युझवेंद्र चहल याच्या कारकीर्दीविषयी जाणून घ्यायचं झालं, तर त्याने भारताकडून 72 वनडे आणि 80 टी20 सामने खेळले आहेत. वनडेत त्याने 5.26च्या इकोनॉमी रेटने 121 विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत 42 धावा खर्चून 6 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. तसेच, टी20त त्याने 8.19च्या इकोनॉमी रेटने 96 विकेट्स घेतल्या आहेत. टी20त 25 धावा खर्चून 6 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. (former cricketer harbhajan singh raises question over droping yuzvendra chahal from asia cup 2023 team)
हेही वाचा-
हॅरी ब्रूकची अविश्वसनीय फिल्डिंग, Catch पकडण्यासाठी दोनदा गेला बाऊंड्रीच्या पलीकडे; तुम्हीही कराल कौतुक
एक चूक आणि पत्ता कट! आशिया चषक आणि वर्ल्डकपपूर्वी खेळाडूंची अग्निपरीक्षा, बीसीसीआयने आखला प्लॅन; वाचाच