नुकतीच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 5 सामन्यांची टी20 मालिका पार पडली. मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (दि. 3 डिसेंबर) बंगळुरूत खेळला गेला. या सामन्यात भारताने 6 धावांनी विजय मिळवत मालिका 4-1ने नावावर केली. या मालिकेत भारतीय संघाचा स्टार सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने जबरदस्त फलंदाजी करत सर्वाधिक धावा केल्या. अशात त्याच्या प्रदर्शनाविषयी भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने म्हटले की, ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेसाठी भारतीय (Team India) संघात जागा मिळू शकते. मात्र, त्याला जागा मिळवण्यासाठी त्याची शुबमन गिल (Shubman Gill) याच्यासोबत तगडी स्पर्धा होऊ शकते.
काय म्हणाला चोप्रा?
आकाश चोप्रा याच्या मते, ऋतुराज गायकवाड याने ऑस्ट्रेलिया मालिकेत शानदार प्रदर्शन करत टी20 विश्वचषकासाठी आपली मजबूत दावेदारी ठोकली आहे. तो म्हणाला, “ऋतुराज गायकवाड याने शानदार प्रदर्शन केले आहे, पण त्याला शुबमन गिलकडून कडवे आव्हान मिळणार आहे. रोहित शर्माही येईल. त्यामुळे ऋतुराजसाठी धावा बनवणे खूपच गरजेचे आहे. जेणेकरून, जोपर्यंत विश्वचषक येईल, तो संघाचा भाग असेल. त्याच्या आणि शुबमन गिल यांच्यापैकी कोणाला एकालाच संधी मिळू शकते. कारण, दोघेही बिल्कुल एकसारखे खेळतात.”
ऋतुराजचा विक्रम
ऋतुराज गायकवाड याच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतील प्रदर्शनाविषयी बोलायचं झालं, तर त्याने संपूर्ण मालिकेत सलामीला फलंदाजी करताना काही शानदार खेळीही केल्या आहेत. त्याने आपल्या दमदार प्रदर्शनाने त्या फलंदाजांच्या यादीत नाव मिळवले, ज्यांनी भारतासाठी टी20 द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा मानही मिळवलाय. त्याने 223 धावा केल्या.
त्याच्यापूर्वी भारतासाठी एका टी20 मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम भारतीय दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर आहे. विराटने इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत 231 धावा केल्या होत्या. तसेच, दुसऱ्या स्थानी केएल राहुल (KL Rahul) असून त्याने न्यूजीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत 224 धावा केल्या होत्या.
ऋतुराजचे मालिकेतील प्रदर्शन
ऋतुराजसाठी मालिकेची सुरुवात खराब राहिली होती. तो विशाखापट्टणम येथील सामन्यात डायमंड डक पद्धतीने बाद होऊन तंबूत परतला होता. त्यानंतर त्याने दुसऱ्या सामन्यात 58 धावांची खेळी केली. तसेच, तिसऱ्या सामन्यात आपल्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्दीतील पहिले शतक ठोकत 123 धावांची नाबाद खेळी केली. रायपूरच्या चौथ्या सामन्यातही त्याने 32 धावांची महत्त्वाची खेळी केली. तसेच, अखेरच्या बंगळुरू सामन्यात त्याला फक्त 10 धावांवर समाधान मानावे लागले.
त्याने या संपूर्ण मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला त्याने. 5 सामन्यात 55.75च्या सरासरीने 223 धावा केल्या. यामध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतकाचा समावेश होता. (former cricketer lauds ruturaj gaikwad s performances in ind vs aus t20is)
हेही वाचा-
आयपीएल 2024 मधून जोफ्रा आर्चरची माघार, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने घेतला धक्कादायक निर्णय
दुखापतीमुळे वेदनेने विव्हळत होता पाकिस्तानी स्टार खेळाडू, स्ट्रेचर नसल्यामुळे आली पाठीवर नेण्याची वेळ- Video