भारताने आजपर्यंत क्रिकेट विश्वाला अनेक जबरदस्त खेळाडू दिले आहेत. त्यामध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांचाही समावेश आहे. भारतीय क्षेत्ररक्षकांची गणना जगभरातील दिग्गज क्षेत्ररक्षकांमध्ये होते. यामध्ये भारताच्या एका खेळाडूचे नाव नेहमी घेतले जाईल, ते म्हणजे मोहम्मद कैफ होय. त्याने कितीतरी विस्फोटक फलंदाजांना पव्हेलियनमध्ये धाडले आहे. विशेष म्हणजे, चाहते कैफला भारतीय संघाचा जाँटी ऱ्होड्स म्हणूनही बोलायचे.
मैदानावर डाईव्ह मारणाऱ्या मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) याला आपण सर्वांनीच पाहिले आहे. मात्र, आता त्याने पहिल्यांदाच 10 हजार फुटांच्या उंचीवरून डाईव्ह मारली आहे. अर्थातच त्याने स्काय डायव्हिंग केली आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो स्काय डायव्हिंग करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “क्रिकेटच्या मैदानावर आम्ही संपूर्ण आयुष्य डाईव्ह मारली आहे, पण ही डाईव्ह चित्तथरारक होती.”
Dived on a cricket field all my life but this dive was the most breathtaking. New Zealand is one big adventure. pic.twitter.com/FCAw9eWjQu
— Mohammad Kaif (@MohammadKaif) December 5, 2022
कैफच्या या व्हिडिओला तुफान पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 30 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तसेच, या व्हिडिओला 2 हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत.
कैफबद्दल बोलायचं झालं, तर त्याने क्षेत्ररक्षणाव्यतिरिक्त नेटवेस्ट ट्रॉफीत खेळण्यात आलेल्या यादगार खेळीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान बनवले आहे. 2002च्या नेटवेस्ट ट्रॉफीत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 326 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने 146 धावांवर 5 विकेट्स गमावले होते. त्यावेळी कैफने युवराजसोबत 6व्या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी रचत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. त्याच सामन्यात विजयादरम्यान लॉर्ड्स मैदानात सौरव गांगुली याने आपला टी-शर्ट काढून हवेत फिरवला होता. तो क्षण आजही क्रिकेट विश्वातील खास क्षण म्हणून ओळखला जातो.
मोहम्मद कैफची कारकीर्द
मोहम्मद कैफच्या क्रिकेट कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारताकडून 13 कसोटी आणि 125 वनडे सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 624 धावा आणि वनडेत 2753 धावा चोपल्या आहेत. त्याने 13 जुलै, 2018 रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, यानंतरही तो स्वत:ला क्रिकेटपासून दूर ठेवू शकला नाही, तो सध्या समालोचक म्हणून काम करताना दिसत आहे. (former cricketer mohammad kaif share his sky diving video see here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: एकीकडे सानियाशी घटस्फोटाच्या बातम्या, तर दुसरीकडे शोएब मुलासोबत लॅम्बोर्गिनीत मारतोय फेरफटका
टीम इंडियात मोठी घडामोड! ‘या’ माजी खेळाडूच्या खांद्यावर महिला संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी