येत्या काही दिवसात आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे. संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ही स्पर्धा होणार आहे. त्यामुळे सर्व संघाची तयारी सुरु झाली असून या स्पर्धेबाबत विविध प्रतिक्रियाही व्यक्त होत आहेत. नुकतेच भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज सबा करीम यांनी या विश्वचषकासाठी त्यांचा १५ जणांचा भारतीय संघ निवडला आहे.
इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंना प्राधान्य
सबा करीब यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, ‘इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवडकर्त्यांनी पाठवलेल्या खेळाडूंमधून मी माझा संघ निवडला आहे. ज्या खेळाडूंनी इंग्लंड दौऱ्यावर चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर त्यांना इंग्लंडमध्ये असल्यामुळे श्रीलंकेला जाण्याची संधी मिळाली नाही अशा खेळाडूंना मी प्राधान्य देत आहे. कारण ते इंग्लंड दौऱ्यावर आहेत, म्हणून त्यांना बाहेर ठेवण्याचे हे निमित्त असू शकत नाही.’
शिखर धवनवर विश्वास नाही
श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत शिखर धवन विशेष कामगिरी करू शकला नाही. सबा करीम यांनीही त्याला त्यांच्या संभाव्य संघात स्थान दिले नाही. त्याऐवजी केएल राहुल आणि रोहित शर्मा या दोघांना सलामीवीर जोडी म्हणून त्यांनी निवडले आहे.
ऑफ स्पिनसाठी वॉशिंग्टन सुंदर
सबा करीब म्हणाले, ‘निवडीमध्ये सातत्य असायला हवे, म्हणून मी वॉशिंग्टन सुंदरला माझ्या संघात घेतले आहे. मला वाटते की, यूएईमध्ये सामने होणार असल्याने संघाला ऑफ स्पिनरची आवश्यकता असेल आणि तो एक अष्टपैलू खेळाडूही आहे.’ हे लक्षात घेण्यासारखे आहे की, सुंदर अजूनही जखमी आहे आणि आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातून बाहेर पडू शकतो, तो टी२० विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा आहे.’
चहलच्या जागी राहुल चाहर
सबा करीम यांनी युझवेंद्र चहल ऐवजी राहुल चाहरवर विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘मी राहुल चाहरची निवड केली आहे, कारण मला वाटते की तो एक आक्रमक गोलंदाज आहे आणि एक विकेट घेणारा आणि मॅचविनरही आहे. मी अजूनही भुवनेश्वर कुमारला संघात ठेवेल, कारण मला वाटते की तो फॉर्ममध्ये परत येत आहे आणि तो टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे.’
श्रेयस अय्यरवरही विश्वास
सबा करीम पुढे म्हणाले, ‘मी श्रेयस अय्यरला संघात ठेवले आहे, कारण तो इंग्लंडविरुद्धच्या भारतात झालेल्या मालिकेदरम्यान संघासोबत होता आणि त्याची कामगिरी चांगली होती, तो यंदा आयपीएल सामने खेळू शकला नाही. पण गेल्या वर्षी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. या आधारावर आपण त्याला संघात ठेवू शकतो.’
सबा करीम यांचा १५ जणांचा भारतीय संघ: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन (यष्टिरक्षक), रिषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, रवींद्र जडेजा, राहुल चहर, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार.
महत्त्वाच्या बातम्या –
‘तू भारताची शान आहेस’, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून २ ऑलिंपिक पदकं जिंकणाऱ्या पीव्ही सिंधूचं कौतुक