पाकिस्तान संघाला सोमवारी (दि. 23 ऑक्टोबर) अफगाणिस्तानविरुद्ध 8 विकेट्सने दारुण पराभव पत्करावा लागला. हा पाकिस्तानचा विश्वचषक 2023 स्पर्धेतील सलग तिसरा पराभव ठरला. या पराभवानंतर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम आणि संघावर आजी-माजी खेळाडूंकडून जोरदार टीका केली जात आहे. अशातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने आगपाखड करत मोठे विधान केले आहे. या पराभवामळे पाकिस्तानसाठी उपांत्य सामन्यात पोहोचण्याचा प्रवास खूपच कठीण झाला आहे.
काय म्हणाला अख्तर?
‘रावळपिंडी एक्सप्रेस’ नावाने ओळखला जाणारा शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने त्याच्या युट्यूब चॅनेलवर पाकिस्तान (Pakistan) संघाविषयी भाष्य केले. तो म्हणाला, “तुम्ही हे प्रदर्शन पाहिल्यानंतर जास्त काही बोलू शकत नाहीत. देवासाठी योग्य खेळाडूला योग्य ठिकाणी निवडून संघात ठेवा. कोणीही अध्यक्ष बनतो. आम्ही आणखी किती दिवस सरासरी दर्जाच्या लोकांना पाठिंबा देणार. तुम्ही सतत सरासरी दर्जाच्या लोकांना पदावर बसवत आहात. तुम्हाला सलग सरासरी प्रदर्शनच मिळत आहे.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “टीव्हीवर आज जे पाहिलं, ते पीसीबीचे खरे प्रतिबिंब आहे. मागील 20-30 वर्षांमध्ये तुम्ही क्रिकेटमध्ये निवडले जात आहात, हा त्याचा सरळ प्रभाव आहे. हा निकाल तुम्हाला अखेरीस मिळत आहे.”
एकही क्रिकेटपटूमध्ये प्रेरणादायी बाब नाही
शोएब अख्तरने असेही म्हटले की, सध्याच्या पाकिस्तान संघात असा एकही क्रिकेटपटू नाहीये, जो तरुणांना क्रिकेट खेळ निवडण्यासाठी प्रेरित करू शकेल. तो म्हणाला, “मला एक गोष्ट सांगा की, या संघात कोणतातरी प्रेरणादायी क्रिकेटपटू आहे का? मी वकार युनूस, वसीम अक्रम, इम्रान खान, स्टीव्ह वॉ, ऍलन बॉर्डर, विवियन रिचर्ड्स यांना पाहिले आहे. पाकिस्तान संघात असा कोणता क्रिकेटपटू आहे, जो तरुणांना क्रिकेट निवडण्यासाठी प्रेरित करू शकेल. लोक आमचे व्हिडिओ का पाहत आहेत. आम्ही पिढीला प्रेरित केले आहे.”
निराश झाला अख्तर
“मी पाकिस्तानसाठी खेळलो आहे. माझे हृदय रडत आहे. मी पाकिस्तानचे समर्थन करत राहील. जर मी बाबरसोबत असतो, तर आताच म्हणालो असतो की, कर्णधारपद सोड. ही सर्वात वाईट गोष्ट घडली. आता आम्हाला चार संघांविरुद्ध खेळायचे आहे. सर्व सामने जिंकायचे आहेत,” असेही अख्तर पुढे म्हणाला.
कर्णधारपद सोडणार बाबर?
“बाबर आझममध्ये हिंमत आहे का? त्याच्यात स्टॅमिना आहे का? त्याच्यात क्षमता आहे का? तो 1992च्या इम्रान खानसारखा कारनामा परत करू शकतो का? शाहीन वसीम अक्रम बनू शकतो का? हॅरिस रौफ आकिब जावेद बनू शकतो का? शादाब मुश्ताक अहमद बनू शकतो का? हा संघ जिंकू शकतो का? मला या संघावर विश्वास आहे, पण त्यांना स्वत:वर आहे? देवालाच माहितीये,” अशाप्रकारे अख्तरने प्रश्नांचा भडीमारही केला.
पाकिस्तानला जिंकावे लागणार 4 सामने
पाकिस्तान संघाने विश्वचषकात खेळलेल्या 5 पैकी 3 सामन्यात पराभव पत्करला आहे. अशात त्यांना विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहायचे असेल, तर पुढील चारही सामन्यात विजय मिळवावा लागेल. जर त्यांनी एकही सामना गमावला, तर त्यांना त्याचा फटका बसू शकतो. (former cricketer shoaib akhtar blasts pcb and pakistan team after chennai debacle against afghanistan in world cup 2023)
हेही वाचा-
वानखेडेवरील SA vs BAN सामन्यात खेळपट्टी कुणाची देणार साथ? वाचा हवामान ते आकडेवारीविषयी सर्वकाही
झुमे जो पठाण! पाकिस्तानच्या पराभवानंतर इरफानने राशिदसोबत दोनदा लावले ठुमके, 3 चुकाही टाकल्या सांगून- Video