सन 1996मध्ये खेळण्यात आलेल्या वनडे विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम खेळले नव्हते. हा सामना भारताविरुद्ध झाला होता. या सामन्यात अक्रम न खेळल्याने त्यावेळी खूप वादविवाद झाले होते. अशात नुकताच अक्रम यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते रागाने लालबुंद झाले. तब्बल 26 वर्षांनंतर अक्रम यांनी मोठा खुलासा केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, भारताविरुद्धच्या या बहुप्रतिक्षित सामन्यात ते का खेळले नव्हते.
भारत आणि पाकिस्तान संघात झालेल्या 1996 विश्वचषकाचा उपांत्यपूर्व सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये खेळला गेला होता. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) आणि पाकिस्तानी फलंदाज आमिर सोहेल यांच्यामध्ये मैदानावर बाचाबाची पाहायला मिळाली होती. प्रसाद यांनी यानंतर सोहेलला बाद करून पव्हेलियनमध्ये धाडत सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. याच सामन्यात वसीम अक्रम (Wasim Akram) हे का खेळले नाहीत, याचा त्यांनी खुलासा केला आहे.
चाहत्याने प्रश्न विचारताच रागाने लाल झाले अक्रम
पाकिस्तानच्या एका टीव्ही चॅनेलशी बोलताना वसीम अक्रम यांना एक प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते रागाने लाल झाले. ते म्हणाले की, “मी तुम्हाला शांत केले आहे. मी तरुणांना सांगितले आहे की, अफवांवर लक्ष देऊ नका. त्यावेळी तुमच्यापैकी अनेकांचा जन्मही झाला नसेल. हे खूप लाजीरवाणे आहे, जेव्हा पाकिस्तानी लोक याबद्दल मला प्रश्न विचारतात. मी तीन दिवसांपूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झालो होतो. मी 34 धावांची खेळी केली होती. डियोन नाशला मी स्वीप मारण्याचा प्रयत्न केला, पण फाईन लेग वर होता, मला त्यावेळी अचानक छातीवर दबाव आला होता. त्यामुळे मी सहा आठवडे बाहेर होतो. वकार इथे बसला आहे, आमचा मुख्य खेळाडू दुखापतग्रस्त आहे याचा भारताला आत्मविश्वास मिळायला नको, म्हणून आम्ही माध्यमांमध्ये काही वाच्यता केली नव्हती. सकाळी वकारने पाहिले, सर्वांनी पाहिले की, मी सकाळी सहा पेन किलर इंजेक्शन लावले होते. मात्र, त्याने काहीच फायदा झाला नाही.”
Wasim Akram on why he missed the 1996 World Cup quarter final versus India "On the morning of the match, I had 6 pain-killing injections but they didn't work" (via A Sports) #Cricket pic.twitter.com/8zcFD3ENeC
— Saj Sadiq (@SajSadiqCricket) October 19, 2022
‘जर मी दुखापतग्रस्त राहून त्या सामन्यात खेळलो असतो, तर…’
अक्रम पुढे बोलताना म्हणाले की, “जर मी दुखापतग्रस्त होऊन त्या सामन्यात खेळलो असतो, तर 10 षटके गोलंदाजी करू शकलो नसतो. त्यावेळी त्यांनी माझ्यावर टीका केली असती. वसीम खेळला नाही म्हणून पाकिस्तान हारला असे म्हणत बाकीचे खेळाडू काय छोले विकायला गेले होते का? ”
भारत विरुद्ध पाकिस्तान संघात खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला 39 धावांनी पराभूत केले होते. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 विकेट्स गमावत 287 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाला 248 धावाच करता आल्या होत्या. यावेळी भारताकडून नवज्योत सिंग सिद्धू यांनी 115 चेंडूत 93 धावा कुटल्या होत्या. तसेच, अजय जडेजा यांनी 25 चेंडूत 45 धावांची वादळी खेळी केली होती. त्यावेळचे वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद आणि फिरकीपटू अनिल कुंबळे यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जरा इकडे पाहा! प्रत्येक विमानतळावर सूर्यकुमार कसा काढतो फोटो? रोहितने नक्कलच करून दाखवली
‘स्पिनर आणि पेसर्सही त्याचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत’, माजी भारतीयाचा सूर्यावर पूर्ण विश्वास