भारतीय संघाचा माजी खेळाडू युवराज सिंग याची गणना जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये होते. युवराजने त्याच्या गोलंदाजी आणि फलंदाजीतून एकापेक्षा एक विक्रम नावावर केले आहेत. युवराजने टी20 विश्वचषक 2007मध्ये एका षटकात स्टुअर्ट ब्रॉड याला मारलेले 6 षटकार कधीच विसरले जाणार नाहीत. आता युवराज क्रिकेटपासून दूर असला, तरीही तो या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. अशात त्याने विश्वचषक 2011 स्पर्धेदरम्यान सचिन तेंडुलकर याने दिलेल्या सल्ल्याचा मोठा खुलासा केला आहे.
खरं तर, विश्वचषक 2011 (World Cup 2011) स्पर्धेदरम्यान भारतीय संघाला साखळी फेरीत दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर चाहत्यांनी भारतीय संघाची टीका करण्यास सुरुवात केली होती. यावर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने संघाला एक महत्त्वाचा सल्ला दिला होता, जो पुढे जाऊन संघासाठी फायदेशीर ठरला.
सचिनच्या सल्ल्याचा युवराजकडून खुलासा
विश्वचषक 2011च्या आठवणी ताज्या करताना युवराज सिंग (Yuvraj Singh) याने सचिनच्या सल्ल्याचाही खुलासा केला. एका वेबसाईटशी बोलताना युवराजने सांगितले की, सचिननेही सर्व खेळाडूंना बातम्या न बघण्यास सांगितले होते. तसेच, विमानतळावर, स्टेडिअमच्या बाहेरील गोंगाट दुर्लक्षित करण्याचाही सल्ला दिला होता.
युवराजने सांगितले की, “सचिन म्हणाला, ‘आपल्याला टीव्ही पाहणे बंद करावे लागेल. वर्तमानपत्र वाचणे बंद करावे लागेल. जेव्हा आपण विमानतळावर गर्दीतून जात असू, तेव्हा आपले हेडफोन घाला. फक्त विश्वचषकावर लक्ष द्या.’ याच्याशी संघ सहमत होता. आम्ही त्याचे पालन केले आणि हे वास्तवात फायदेशीर ठरले.”
‘यावेळीही संघावर दबाव’
युवराज पुढे बोलताना म्हणाला की, “यावेळीही भारतीय संघावर दबाव आहे. घरच्या मैदानावर जितका फायदा मिळेल, खेळाडूंवर त्याहून जास्त लोकांच्या अपेक्षांचा दबाव असेल. संघाला या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्या प्रदर्शनावर लक्ष द्यावे लागेल.”
युवराजचे विश्वचषक 2011मधील प्रदर्शन
युवराज सिंग याने वनडे विश्वचषक 2011च्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. त्याने 1 शतकासह 4 अर्धशतके झळकावत एकूण 362 धावा केल्या होत्या. तसेच, गोलंदाजी करताना 15 विकेट्सही घेतल्या होत्या. या दमदार प्रदर्शनावर युवराजला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. युवराजला संपूर्ण स्पर्धेत एकूण 4 वेळा सामनावीर पुरस्कार मिळाला होता. (former cricketer yuvraj singh reveals advice of sachin tendulkar gave team during world cup 2011)
हेही वाचा-
इतिहास ODI World Cupमधील पहिल्या सामन्यांचा, वाचा सर्वाधिक वेळा कुणाच्या पदरी पडलाय विजय
अश्विनच्या ‘डुप्लिकेट’ने धुडकावून लावली ऑस्ट्रेलियाची ऑफर, वर्ल्डकपमध्ये मदत करण्यास दिला नकार