भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने मागील काही काळात आपल्या दमदार प्रदर्शनाने लाखो क्रिकेटरसिकांची मने जिंकली आहेत. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर पंतने इंग्लंडला कसोटी, टी२० आणि वनडे मालिकेत व्हाईटवॉश देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपल्या चौफेर फटकेबाजीने त्याने वनडे मालिकेतील अवघ्या २ सामन्यात १५५ धावा चोपल्या आहेत. त्याच्या या प्रदर्शनाने इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू इयान बेल यांनाही भुरळ पाडली आहे.
‘ईएसपीएन क्रिकइंफो’शी बोलताना बेल यांनी म्हटले आहे की, “मी पंतशिवाय भारतीय संघाची कल्पनाही करु शकत नाही. असे वाटते की तोच भारतीय संघाचे भविष्य आहे. तो एक विश्वस्तरीय खेळाडू आहे. त्याच्यात दुर्लभ प्रतिभा आहे. ही त्याच्या कारकिर्दीची नुसती सुरुवात आहे. त्याचे क्रिकेटमधील पुढील भवितव्य खूप उज्ज्वल आहे. तो एक अविश्वसनीय खेळाडू आहे. तो वास्तवातील मॅच विनर आहे.”
“पंतसाठी इंग्लंडविरुद्धच्या क्रिकेट मालिका अतिशय शानदार राहिल्या आहेत. त्याने क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात चांगले प्रदर्शन केले आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीचे नमुने आपण बऱ्याचदा पाहिले आहेत. मात्र या मालिकेद्वारे त्याच्यातील शांतचित्त फलंदाजही पाहायला मिळाला. त्याने जोखमीचे शॉट न खेळता संघाला आधार दिला आणि मोठी धावसंख्या उभारण्यात योगदान दिले,” अशा शब्दात बेल यांनी पंतचे कौतुक केले आहे.
२३ वर्षीय पंतने इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत ४ सामन्यात २७० धावा, टी२० सामन्यांच्या मालिकेत १०२ धावा आणि वनडे मालिकेत २ सामन्यांत १५५ धावा केल्या आहेत. यानंतर पंत इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा हंगाम गाजवताना दिसेल. तो यंदा दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका गाजवणारा ‘हा’ भारतीय गोलंदाज, आता मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळण्यास सज्ज
इंग्लंडचा भारत दौरा संपल्यानंतर कुठे पोहोचला कोहली? ‘या’ दिवशी होणार आरसीबीत सहभागी
केकेआर आणि आरसीबी या दोन संघांसाठी आयपीएलमध्ये खेळलेले ३ दिग्गज खेळाडू






