फार पुर्वीपासूनच क्रिकेटविश्वात भारतीय क्रिकेट संघाचा दबदबा राहिला आहे. कपिल देव, सौरव गांगुली, एमएस धोनी अशा बऱ्याचशा संघनायकांनी त्यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाला यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली हादेखील त्याची जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली मागील काही काळात भारतीय संघ अजेय राहिला आहे.
परंतु भारतीय संघाच्या यशामध्ये कर्णधार कोहलीपेक्षा जास्त दुसऱ्या एका व्यक्तीचा मोठा वाटा राहिला असल्याचे वक्तव्य इंग्लंडचे माजी फिरकीपटू माँटी पानेसर यांनी केले आहे. ते इंडिया टुडेशी बोलत होते.
पानेसर म्हणाले की, “भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हेच ते व्यक्ती होते, ज्यांनी भारतीय संघाला स्वत:वर विश्वास ठेवायला शिकवले. गतवर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ऍडलेड कसोटी सामन्यात अवघ्या ३६ धावांवर सर्वबाद होण्याची नामुष्की भारतीय संघावर ओढावली होती. परंतु त्यानंतर त्यांनी ज्याप्रकारे पुनरागमन केले होते, ते कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नव्हते.”
भारत कोहलीपेक्षा जास्त शास्त्रींचा संघ
“शास्त्रींनी भारतीय संघाला अजेय राहण्याचा विश्वास दिला. जेव्हा कोहली भारतीय संघासोबत उपस्थित नव्हता, तेव्हा शास्त्रींनीच संघाला सांभाळले होते. दुखापतींमुळे एकामागून एक खेळाडू संघातून बाहेर होत होते. परंतु शास्त्रींच्या नेतृत्त्वात (मार्गदर्शनाखाली) भारतीय संघाने कमालीची हिम्मत दाखवली. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्याच भूमीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात भारतीय संघाचे पूर्णपणे सहकार्य केले. त्यांनी संघाचे मनोबळ वाढवले. ते मागील काही महिन्यांपासून भारतीय संघाच्या प्रदर्शनाचे आकलन करत आहेत. त्यामुळे भारत हा कोहलीपेक्षा जास्त शास्त्रींचा संघ दिसत आहे,” असे त्यांनी शेवटी म्हटले.
भारताने ऑस्ट्रेलियात रचला होता इतिहास
साल २०२०-२१ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. यावेळी उभय संघाच ४ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला होता. परंतु त्यानंतर दमदार पुनरागमन करत त्यांनी ऑस्ट्रेलियाला २-१ ने पराभवाची धूळ चारली होती. त्यातही चौथ्या आणि अखेरच्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात भारताने ऐतिहासिक विजय नोंदवला होता. त्यानंतर मायभूमीत भारतीय संघाने इंग्लंडलाही कसोटी मालिकेत पराभूत केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
वर्ल्डकप असो वा चॅम्पियन्स ट्रॉफी, आयसीसी चषकांवर ‘या’ कर्णधारांचेच अधिराज्य
पुनरागमन अशक्य! असे ३ क्रिकेटपटू, ज्यांच्यासाठी भारतीय संघाची दारे कायमची झाली बंद
टॉप-३ संघ, ज्यांच्यावर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ओढावली पराभवाची नामुष्की; भारत ‘या’ स्थानी