इंग्लंडचे दिग्गज फलंदाज ग्रॅहम थॉर्प यांचं निधन झालं आहे. ते गेल्या बऱ्याच काळापासून आजारी होते. थॉर्प यांनी वयाच्या 55व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ग्रॅहम थॉर्प यांनी चार दिवसांपूर्वी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी वाढदिवस साजरा केला होता. थॉर्प यांच्या आजाराबाबत कोणत्याही प्रकारचा खुलासा करण्यात आलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते बऱ्याच दिवसांपासून आजारानं त्रस्त होते.
थॉर्प यांनी सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांसारख्या महान भारतीय फलंदाजांच्या युगात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं आहे. त्यांचा समावेश इंग्लंडच्या त्या मोजक्या क्रिकेटपटूंमध्ये होतो, ज्यांनी 100 कसोटी सामने खेळले आहेत. थॉर्प यांनी भारताविरुद्ध 5 कसोटी सामने खेळले होते. याशिवाय त्यांनी भारताविरुद्ध एकदिवसीय सामनेही खेळले आहेत.
ग्रॅहम थॉर्प यांनी 1993 ते 2005 दरम्यान इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं. या काळात त्यांनी 100 कसोटी आणि 82 एकदिवसीय सामने खेळले. कसोटीच्या 179 डावांमध्ये फलंदाजी करताना त्यांनी 44.66 च्या सरासरीनं 6744 धावा केल्या, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 200 होती. थॉर्प यांनी कसोटीत 16 शतकं आणि 39 अर्धशतकं झळकावली आहेत. याशिवाय त्यांनी कसोटीच्या 6 डावात गोलंदाजीही केली, मात्र त्यांच्या नावे एकही विकेट नाही.
थॉर्प यांनी एकदिवसीय सामन्याच्या 77 डावात फलंदाजी करताना 2380 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यांची सरासरी 37.18 एवढी राहिली. 89 ही त्यांची एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या धावा होती. थॉर्प यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 21 अर्धशतकं झळकावली आहेत. याशिवाय त्यांनी एकदिवसीय सामन्यांच्या 5 डावात गोलंदाजी करताना 2 बळीही घेतले आहेत.
ग्रॅहम थॉर्प यांनी केवळ आपल्या फलंदाजीनंच क्रिकेटमध्ये योगदान दिलेलं नाही, तर ते एक उत्कृष्ट प्रशिक्षकही राहिले आहेत. 2005 मध्ये त्यांनी साऊथ वेल्सचं प्रशिक्षकपद भूषवलं. यानंतर ते इंग्लंड लायन्सचे प्रशिक्षक बनले. 2013 मध्ये त्यांची इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी20 संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकापदी नियुक्ती झाली. 2019 मध्ये जेव्हा ख्रिस सिल्वरवूड इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक बनले, तेव्हा थॉर्प त्यांच्या 3 सहाय्यक प्रशिक्षकापैकी एक होते. मार्च 2022 मध्ये थॉर्प यांची अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, परंतु ही जबाबदारी स्वीकारण्यापूर्वीच ते गंभीर आजारी पडले.
हेही वाचा –
ऐकावं ते नवलच…! खेळाडूनं हातानं नव्हे चक्क पायानं झेल घेतला; भन्नाट व्हिडिओ व्हायरल
भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा एकदिवसीय सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर होईल का?
फिरकीपटूंपुढे लोटांगण, 27 वर्षांपासूनची विजयी मालिका थांबली; श्रीलंकेविरुद्ध पराभवानंतर अनेक विक्रम मोडले