लीड्समधील हेडिंग्ले मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत संघात तिसरा कसोटी सामना पार पडला होता. हा सामना इंग्लंडने १ डाव आणि ७६ धावांनी जिंकला. दरम्यान पहिल्या डावात ३५४ धावांची पिछाडी स्विकारल्यानंतर दुसऱ्या डावात भारताच्या वरच्या फळीने चांगली फलंदाजी केली होती. मात्र, नंतर मधली आणि खालची फळी कोलमडल्याने भारताने हा सामना गमावला.
गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये असलेल्या चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या डावात कमालीची फलंदाजी केली. ज्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात टिकून राहण्यासाठी थोडी मदत मिळाली होती. पुजाराने या डावात ९१ धावा केल्या. या दौऱ्यातील पुजाराची ही पहिलीच मोठी खेळी आहे, याच्या आधी पुजाराची बॅट चालली नव्हती. यामुळे पुजाराच्या फलंदाजीचे आता कौतुक केले जात आहे.
यादरम्यान इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू डेविड लॉईडने पुजाराच्या या उत्कृष्ट खेळीचे रहस्य उलगडले आहे. त्याच्या मते इंग्लिश गोलंदाजांनी पुजाराला गोलंदाजी करताना एक मोठी चूक केली. ज्यामुळे पुजारा चांगली खेळी करू शकला.
तसेच मागील सामन्यात इंग्लिश गोलंदाजांनी पुजाराला ऑफ स्टंप जवळ गोलंदाजी केली होती. त्यामुळे पुजाराला खेळण्यात अडचण येत होती. मात्र या सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लिश गोलंदाजांनी पुजाराला लेग साईडवर गोलंदाजी केली. यावेळी इंग्लिश गोलंदाजांनी सुनियोजित गोलंदाजी केली नाही, असेही मत लॉइडने व्यक्त केले.
याबाबत लॉइडने ‘डेली मेल’च्या एका स्तंभात लिहिले, “चेतेश्वर पुजाराला या दौऱ्यातील सुरुवातीचा काळ खराब गेला होता. कारण इंग्लिश गोलंदाजांनी त्याला ऑफ स्टॅम्प आणि त्याच्या आसपास गोलंदाजी केली होती. मात्र, शुक्रवारी (२७ ऑगस्ट) इंग्लिश गोलंदाजांनी याच्या उलट केले, त्यांनी पुजाराला लेग साईडवर गोलंदाजी केली. आणि याच ठिकाणी पुजारा चांगल्या पद्धतीने खेळतो.”
“इंग्लिश गोलंदाजांनी पुजाराबाबत कोणतीही चूक करू नये. तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे. तसेच तो भारतीय संघात राहुल द्रविडच्या जागी खेळत आहे. या डावात तो पूर्णपणे सकारात्मक मानसिकतेने खेळला आहे. तसेच इंग्लिश गोलंदाजांनी मात्र सुनियोजित अशी गोलंदाजी केली नाही,” असेही लॉईड पुढे म्हणाला.
भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने देखील पुजाराचे केले कौतुक
रोहित सामन्याचा तिसरा दिवस संपल्यानंतर एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला होता, “हो, पुजारा निश्चितच धावा करण्याच्या इराद्यानेच आला होता. आमचा हा डाव कधीच अस्तित्वासाठी नव्हता. आमच्या डोक्यात फक्त संघासाठी धावा करणे एवढेच होते, आणि ते पुजाराने केले देखील. ज्याप्रकारे पुजारा खराब फॉर्मशी झगडत होता, तिथून त्याने चांगले पुनरागमन करत सामन्यात दमदार खेळी केली. गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केल्यास त्यावर तो उत्कृष्टपणे खेळायचा.”
“यावरून फलंदाजांची मानसिकता आणि उत्साह दिसून येतो जे संघासाठी फायदेशीर आहे. ज्यावेळी तुम्ही अशा मानसिकतेने मैदानात उतरतात, तेव्हा नेहमीच संघाला याचा फायदा होतो,” असेही रोहित शर्मा म्हणाला.
दरम्यान, दुसऱ्या डावात इंग्लंडने ४३२ धावा करुन ३५४ धावांची आघाडी मिळवली होती. यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला. तेव्हा सलामीचा फलंदाज केएल राहुल (०८) स्वस्तात बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्या चेतेश्वर पुजाराने यावेळी मात्र चांगली खेळी करत भारतीय संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
ज्यानंतर रोहित शर्मा देखील ५९ धावसंख्येवर ऑली रोबिन्सनच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन बाद झाला. नंतर कर्णधार विराट कोहलीने देखील पुजारा सोबत चांगली भागीदारी केली. मात्र, चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच पुजारा ९१ धावा करुन आणि विराट ५५ धावांवर बाद झाले.
त्यानंतर एकाही भारतीय फलंदाजाला टिकून फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे भारताचा दुसरा डाव २७८ धावांवर आटोपला. याचमुळे इंग्लंडने हा सामना १ डाव आणि ७६ धावांनी जिंकत मालिकेत १-१ अशी आघाडी मिळवली.
महत्त्वाच्या बातम्या –
–चेतेश्वर पुजाराचा तो शॉट पाहून अंपायरही घाबरले, भीतीपोटी असं वाचवलं स्वत:ला, पाहा व्हिडिओ
–मैदानात घुसखोरी केलेल्या भारतीय चाहत्यावर केली गेली ‘कडक कारवाई’
–रहाणे नसता, तर विराटचे अर्धशतक झळकावणे होते कठीण, वाचा काय घडले नक्की