भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसून येत आहे. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तरप्रदेशचे कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.
याबद्दल शनिवारी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा समालोचक आकाश चोप्राने ट्विट करत पुष्टी केली आहे. त्याने ट्विट केले आहे की ‘चेतन चौहान हे देखील कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आढळले आहेत. तूम्ही लवकर बरे व्हा सर.’
याबरोबरच आरपी सिंगनेही याबद्दल ट्विट केले आहे. त्याने म्हटले आहे की ‘नुकतेच ऐकले की चेतन चौहान सर देखील कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळले आहेत. ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो.’
काही मीडिया रिपोर्टनुसार त्यांना लखनऊमधील संजय गांधी पीजीआय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
चौहान यांच्या आधीही अनेक क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यात मश्रफे मोर्तझा, शाहिद आफ्रिदी, मोहम्मद हाफिज, वहाब रियाज अशा काही मोठ्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे.
चौहान यांनी भारताकडून 1969 ते 1978 दरम्यान 40 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यांनी 31.57 च्या सरासरीने 2084 धावा केल्या आहेत. यात त्यांच्या 16 अर्धशतकांचा समावेश आहे. याबरोबरच त्यांनी 7 वनडे सामने खेळले असून यात 153 धावा केल्या आहेत.
1970 च्या दशकात त्यांची आणि सुनील गावसकरांची एक यशस्वी सलामी जोडी म्हणून ओळखली जात होती. त्यांनी 10 शतकी भागीदाऱ्या केल्या आहेत. तसेच भागीदारीत 3000 धावा केल्या आहेत.
तसेच चौहान यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली आणि महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
लॉकडाऊनमध्ये पैशांची कमतरता, भारतीय दिग्गज खेळाडू विकणार बीएमडब्लू कार
त्याचे चुकिचे वागणे पाकिस्तानला भोवले व आम्हाला भारताने दणदणीत पराभूत केले
पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूने केली तुलना; सेहवागच्या त्रिशतकापेक्षा सचिनची ‘ती’ खेळ लाखपटीने भारी