भारताचा माजी फुटबॉलपटू जो एकेवेळी इंडियन टेलेफोन इंडस्ट्री (आयटीआय ) आणि भारताकडून बचावफळीत खेळलेला जे. मोहन कुमार सध्या माऊंट कार्मेल कॉलेज, बेंगळुरू येथे वॉचमनची नोकरी करतो.
याचबरोबर भारतात चॅम्पियन्सला निवृत्तीनंतर कसं विसरलं जात याच मोठं उदाहरण पुन्हा एकदा समोर आलं आहे.
जे. मोहन कुमार यांनी ३० वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत १९७७ साली फेडेरेशन कप आयटीआयसाठी जिंकला होता. तसेच त्यांनी गार्डन सिटी कॉलेज फुटबॉल संघालाही फुटबॉल प्रशिक्षण दिल असल्याचं बेंगळुरू मिररमध्ये आलेल्या एका बातमीत म्हटलं आहे. परंतु या संघाबरोबर झालेल्या मतभेदानंतर त्यांनी प्रशिक्षकपद सोडले. परंतु पुन्हा चांगली नोकरी मिळत नसल्या कारणाने त्यांनी माऊंट कार्मेल कॉलेज, बेंगळुरू येथे वॉचमनची नोकरी स्वीयकारली.
बेंगळुरू मिररबरोबर बोलताना जे. मोहन कुमार म्हणाले, ” माझा एक मित्र येथे ड्राइवर म्हणून काम करतो. मी जेव्हा त्याला कॉलेजमध्ये एखादी नोकरी मिळेल का असे विचारले असता त्याने मला वॉचमनच्या नोकरीबद्दल सांगितले. माझा मित्र म्हणाला तुझ्यासारख्या महान फुटबॉलपटू येथे काम करणं योग्य नाही. परंतु मी काम केलं नसत तर ते माझ्यासाठी अवघड झालं असत. सध्या मी तेथे आयकार्ड तपासणे किंवा कोणती चुकीची गोष्ट होणार नाही याची जबाबदारी पार पडतो. हे मुलींच कॉलेज असल्यामुळे त्यांना सुरक्षित ठेवणं ही माजी जबाबदारी आहे. मी आधी काय केलं आहे याचा विचार करत नाही. ही माझी जबाबदारी आहे आणि ती मी आनंदाने पार पडतो. ”
अंबूर, तामिळनाडू येथे जन्म झालेले जे. मोहन यांनी वयाच्या १५व्या वर्षी फुटबॉलसाठी बेंगळुरू गाठले होते. या वयातच जबदस्त प्रतिभेच्या आधारावर त्यांनी निवड समितीच लक्ष वेधलं होत.
नोकरी का स्वीकारली असे विचारलं असता जे. मोहन कुमार म्हणतात, “मी घरी तसाही बेरोजगार होतो. मी काही करत नव्हतो आणि काही न कमावता जगत होतो. मी कोणतीही लाज न बाळगता माज्या परिवाराला मदत होण्यासाठी ही नोकरी स्वीकारली आहे. मी येणाऱ्या सर्व लोकांच आनंदाने स्वागत करतो. ”
देशात जे. मोहन कुमारांसारखे असंख्य माजी खेळाडू आहेत ज्यांनी देशासाठी काहीतरी केलं आहे परंतु त्यांच्या पदरी कायम निराशाच आली आहे.