भारतीय संघाचे माजी सलामीवीर आकाश चोप्रा यांनी तिसर्या वनडे सामन्यातील भारतीय संघाच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. आकाश चोप्राच्या म्हणण्यानुसार, संघात एकाच वेळी इतके बदल केले जाऊ नयेत. कदाचित यामुळेच या सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.
तिसर्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघाने ६ बदल केले होते. या सामन्यातून ५ खेळाडूंना वनडे पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. कृष्णाप्पा गौतम, चेतन साकारिया, नितीश राणा, संजू सॅमसन, राहुल चहर हेच ते खेळाडू होते. तर अनुभवी भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली होती.
भारतीय संघाने ६ बदल करायला नको होते
आकाश चोप्राने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर भारतीय संघाच्या रणनीतीवर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, “आपण आपल्या संघात सहा बदल केले ते योग्य नव्हते. तिसर्या वनडे सामन्यात भारताने श्रीलंकेला हलक्यात घेतले असे दिसले. भारताने यापूर्वीच वनडे मालिका जिंकली होती आणि कदाचित या कारणामुळेच त्यांनी या सामन्यास जास्त महत्त्व दिले नाही. पण, पदार्पण करणाऱ्यांसाठी हा सामना खूप महत्वाचा होता. कारण, संघाला असे वाटले होते की, श्रीलंकेचा संघ कमकुवत आहे आणि आम्ही त्यांचा सहज पराभव करू. या पराभवातून भारतीय संघाला धडा मिळाला आहे की, प्रतिस्पर्धी संघाला कधीही हलक्यात घेऊ नये.”
भारतीय संघाला तिसर्या वनडेमध्ये नियोजनाचा अभाव होता
तो म्हणाले की, “भारताने सहा बदल केले त्यातील ५ नव्या खेळाडूंना खेळवत संपूर्ण गोलंदाजी क्रम बदलला. या सामन्यात दुसर्या वनडे सामन्यातील एकही गोलंदाज नव्हता. फलंदाजीतही संघाने नितीश राणा याला खेळू दिले होते. मात्र, तो अव्वल क्रमांकाचा खेळाडू असताना देखील त्याला ७ व्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली होती.”
दरम्यान श्रीलंकेच्या संघाने तिसर्या आणि अंतिम वनडे सामन्यात भारताला ३ गडी राखून पराभूत केले होते. पावसामुळे सामना ४७ षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करणारा भारतीय संघ ४३.१ षटकांत केवळ २२५ धावांवर सर्वबाद झाला होता. श्रीलंकेला २२७ धावांचे लक्ष्य डकवर्थ लुईस नियमाद्वारे मिळाले, जे त्यांनी ३९ षटकांत ७ गडी गमावत पूर्ण केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
माही नव्या इनिंगला करणार सुरुवात, प्रशिक्षण क्षेत्रात ठेवणार पाऊल; पाकिस्तानातून भविष्यवाणी
विराट-सचिनच्या तुलेनवर भडकला पाकिस्तानी क्रिकेटर; म्हणे, ‘अशी निरर्थक गोष्ट करणे थांबवा’