भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात रविवारी (२८ मार्च) गहुंजे स्टेडियम, पुणे येथे झालेला तिसरा आणि अंतिम वनडे सामना अतिशय रोमहर्षक ठरला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३२९ धावा करत इंग्लंडला ३३० धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ३२२ धावाच करू शकला आणि भारताने ७ धावांनी सामना खिशात घातला. यासह २-१ च्या फरकाने भारताने वनडे मालिकाही जिंकली.
एका अर्थाने भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर या सामन्याचा नायक ठरला. त्याच्या या सामन्यातील कामगिरीचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यानेही विशेष शब्दांत त्याची पाठ थोपटली आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत सेहवागने लिहिले की, ‘ठोकर खाकरही आदमी ठाकूर बनता है. हे फक्त शार्दुलमुळे साध्य झाले आहे. तो एक गेम चेंजर आहे.’
https://twitter.com/virendersehwag/status/1376181250143133697?s=20
शार्दुल ठाकूर ठरला भारताचा ‘विकेट टेकर’
२९ वर्षीय शार्दुलने भारताला हा अटीतटीचा सामना जिंकून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. भारतीय फलंदाजांनी बलाढ्य इंग्लंडच्या गोलंदाजीवर ३२९ धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची वरची फळी अधिक धावा जोडण्यात अपयशी ठरली.
मात्र मधल्या फळीतील डेविड मलान, लियाम लिविंगस्टोन यांची जोडी बाद करत शार्दुलने भारतीय संघापुढील मोठा अडथळा दूर केला. याबरोबरच यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर यालाही अवघ्या १५ धावांवर रोखले. त्यानंतर सामन्याच्या अंतिम टप्प्यात सॅम करन एकाकी झुंज देत होता. यावेळी फिरकीपटू आदिल रशीदही बचावात्मक खेळी करत त्याला साथ देत होता. मात्र शार्दुलने विराट कोहलीच्या हातून रशीदला झेलबाद करत सामन्याची रंगत वाढवली.
थोडक्यात सांगायचे झाले तर, जेव्हा- जेव्हा विकेटची गरज होती, तेव्हा- तेव्हा शार्दुलने गोलंदाजी करत भारतीय संघाला विकेट मिळवून दिली. त्यामुळे अगदी समालोचकांनी ‘विकेट टेकर’ संबोधत त्याचे कौतुक केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
शार्दुल ‘मॅन ऑफ द मॅच’ नसल्याचं ऐकून आश्चर्य वाटलं; भारतीय कर्णधाराने व्यक्त केला संताप
‘या’ गोलंदाजाला खेळण्यात आला अडथळा; तिसऱ्या वनडेत नाबाद ९५ करणाऱ्या सॅम करनचा खुलासा
‘थाला’च्या एका सल्ल्याने बदलली मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची खेळी, म्हणाला..






