शनिवार रोजी (२९ मे) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) विशेष सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेला इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा उर्वरित हंगाम युएईमध्ये घेण्याचा निर्णय घेतला गेला. भारतात सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात पावसाचे दिवस असल्याकारणाने हे सामने युएईत होणार आहेत. याबरोबरच भारतात होणाऱ्या आगमी टी२० विश्वचषक आयोजनाबद्दल निर्णय घेण्यासाठी आयसीसीला काही दिवसांचा अवधी मागण्यात आला.
यानंतर ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज मायकल हसी यांनी विश्वचषकासाठी भारत यात्रा करणे सुरक्षित नसल्याचे म्हणले होते. आता माजी भारतीय क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी हसींसह ऑस्ट्रेलियाच्या सर्व क्रिकेटपटूंना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
भारत देशातील कोविड-१९ची स्थिती सध्या चिंताजनक आहे. याच कारणामुळे २९ सामन्यानंतर आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता. दरम्यान आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचे फलंदाजी प्रशिक्षक असलेल्या हसी यांना भारतात असताना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे भारतात टी२० विश्वचषक आयोजनाचा मुद्दा पुढे आल्यानंतर त्यांनी विरोध दर्शवला होता.
यावर उत्तर देताना गावसकरांनी म्हटले आहे की, “भारतात टी२० विश्वचषक २०२१ चे आयोजन होणे ही जास्त आश्चर्य वाटण्याजोगी गोष्ट नाह. विशेषत: ऑस्ट्रेलिया संघासाठी. कारण यापुर्वी आपण पाहिले आहे की, वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या राखीव खेळाडूंनी एका झटक्यातच त्यांना गारद केले होते.”
“मला मान्य आहे की, भारत देश सध्या कोरोनाच्या भयानक दशेतून जात आहे. परंतु टी२० विश्वचषक आयोदनास अजून ४ पेक्षा अधिक महिन्यांचा कालावधी बाकी आहे. भारतातील जास्ती-जास्त लोक कोरोनाची लस टोचून घेत आहेत. अधिकाधिक शहरे आणि राज्यात कोरोनाची स्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत. यावर्षी मेलबर्नमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला असतानाही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. ज्याप्रकारे तुम्हाला तुमच्या देशात मोठमोठ्या स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. त्याप्रकारेच कृपया आम्हालाही ही संधी मिळू द्या,” असे गावसकरांनी पुढे सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनी की विराट? कोण आहे भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार, पाहा आकडेवारी
WTC Final: पुजाराने पुढे आणली भारतीय संघाची नवीकोरी जर्सी, जडेजापेक्षा आहे वेगळी