भारतीय क्रिकेट संघाने नुकताच आपला झिम्बाब्वे दौरा पूर्ण केला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने ३-० असे निर्भेळ यश मिळवले. या विजयानंतर भारतीय संघाचे कौतुक केले जातेय. मात्र, झिम्बाब्वेला क्लीन स्विप दिल्यानंतरही एका माजी भारतीय क्रिकेटपटूने भारतीय संघाच्या रणनीतीविषयी नाराजी व्यक्त केली आहे.
हरारे येथे झालेल्या तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने यजमान संघाचा १३ धावांनी पराभव करत मालिका खिशात घातली. मालिकेतील पहिले दोन सामने देखील भारताने १० गड्यांनी व ५ गड्यांनी जिंकलेले. विशेष म्हणजे भारतीय कर्णधार केएल राहुल याने तीनही सामन्यात नाणेफेक जिंकली. त्यापैकी पहिल्या दोन सामन्यात त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हाच निर्णय माजी भारतीय क्रिकेटपटू मनिंदर सिंग यांना आवडला नाही.
तिसऱ्या सामन्यानंतर प्रसारण वाहिनीशी बोलताना मनिंदर म्हणाले,
“भारतीय संघाने तीनही सामन्यात वर्चस्व राखले. मात्र, मला त्यांची रणनीती तितकीशी आवडली नाही. राहुलने सर्व सामन्यात नाणेफेक जिंकली. मात्र त्याने दोन वेळा गोलंदाजीचा निर्णय घेतला. झिम्बाब्वे संघ तुलनेने कमजोर होता. अशा परिस्थितीत प्रथम फलंदाजी घेत अनेक पर्यायांना तपासता आले असते. त्यानंतर गोलंदाजांनाही आपली योग्यता सिद्ध करण्याची संधी मिळाली असती. मालिकेच्या सुरुवातीपासूनच हा विचार करायला हवा होता.”
उभय संघातील या अखेरच्या सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल याने आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक ठोकले. या जोरावर भारतीय संघाने २८९ धावा उभारल्या होत्या. भारतीय संघाने दिलेल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा अनुभवी अष्टपैलू सिकंदर रझाने शतक झळकावून विजयासाठी शर्थीच प्रयत्न केले. मात्र, संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आता आयपीएल तेव्हाच खेळेल, जेव्हा…’; बेन स्टोक्सने केले महत्वाचे विधान
काय गोलंदाजी केलीस भावा? सगळेच फलंदाज शून्यावर बाद, १५ चेंडूत पालटला सामना
नातं तुटल्याच्या चर्चांनंतर एका महिन्यासाठी धनश्री जातेय माहेरी! ऐकून चहलने दिली अशी प्रतिक्रिया