भारताचा नवोदित यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने मागील काही काळात आपल्या दमदार प्रदर्शनाने लाखो क्रिकेटरसिकांची मने जिंकली आहेत. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवल्यानंतर पंतने इंग्लंडला कसोटी, टी२० आणि वनडे मालिका जिंकत व्हाईटवॉश देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एवढेच नव्हे तर, आता पंतच्या खांद्यावर आयपीएल संघाच्या नेतृत्त्वाची धुराही पडली आहे. त्याच्या या ‘अच्छे दिन’च्या काळात माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना याने खळबळजनक भाष्य केले आहे.
पंतने आपल्यातील धमक दाखवण्यानंतर त्याचे गुणगान गाणारे लोक यापुर्वी फिटनेसवरुन त्याच्यावर टिका करत असत. त्यावेळी त्याला पाठिंबा देण्याची आवश्यकता असताना कोणीही पुढाकार घेतला नाही. सर्वांनी मंदिरातील घंटा वाजल्याप्रमाणे पंतची वाजवली असल्याचे म्हणत रैनाने संताप व्यक्त केला आहे.
रैना म्हणाला की, “पंतला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीला फिटनेस संबंधी अनेक समस्या उद्भवल्या होत्या. त्याने त्यावेळी अतिशय वाईट परिस्थितीचा सामना केला होता. मंदिरातील घंटा वाजवावी तशीच काही अवस्था लोकांनी पंतची केली होती. परंतु आता हे चित्र बदलले आहे. पंतने मागील काही काळात स्वत:ला सिद्ध केले आहे.”
“पंतसारख्या खेळाडूला खुलून फलंदाजी करण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे. त्याला समर्थनाची गरज आहे आणि भारतीय कर्णधार विराट कोहली त्याला पाठिंबा देत आहे. पंतची लय पाहता तो येती १०-१५ वर्षे भारतीय संघाचा प्रमुख सदस्य राहील,” असे पुढे बोलताना रैना म्हणाला.
इंग्लंडच्या दिग्गजानेही उधळली होती स्तुतिसमुने
पंतच्या प्रदर्शनाने प्रभावित होऊन इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू इयान बेल यांनीही त्याची स्तुती केली होती. “मी पंतशिवाय भारतीय संघाची कल्पनाही करु शकत नाही. असे वाटते की तोच भारतीय संघाचे भविष्य आहे. तो एक विश्वस्तरीय खेळाडू आहे. त्याच्यात दुर्लभ प्रतिभा आहे. ही त्याच्या कारकिर्दीची नुसती सुरुवात आहे. त्याचे क्रिकेटमधील पुढील भवितव्य खूप उज्ज्वल आहे. तो एक अविश्वसनीय खेळाडू आहे. तो वास्तवातील मॅच विनर आहे,” अशा शब्दात त्यांनी पंतचे कौतुक केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयची चिंता शिगेला! आयपीएल आधी वानखेडे स्टेडियमचे ‘इतके’ ग्राउंड्समन कोरोना पॉझिटिव्ह
हवेत उडत खेळाडूने अलगद पकडला झेल, फलंदाजाची रिऍक्शन होती लक्षवेधी; पाहा जबराट व्हिडिओ
आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद किंवा नाबाद राहिलेले कमनशिबी फलंदाज, एक तर दोन वेळा…