भारतीय संघात गेल्या काही वर्षांपासून यष्टीरक्षक फलंदाजाच्या भूमिकेसाठी चांगलीच स्पर्धा रंगल्याचे पाहायला मिळाले आहे. एमएस धोनी भारतीय संघात असताना दिनेश कार्तिकला खेळण्याची संधी मिळत नव्हती. तसेच एमएस धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर रिषभ पंत आणि रिद्धिमान साहा या दोघांमध्ये संघात स्थान मिळवण्यासाठी चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली.
अजूनही या दोघांमध्ये तुलना होताना दिसते. परंतु मागील काही काळात रिषभ पंतने आपल्या प्रदर्शनाने सिद्ध केले की, तोच ही भूमिका पार पाडण्यासाठी योग्य आहे. अशातच माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज अजय रात्रा यांनी देखील आपले मत मांडले आहे.
अजय रात्रा यांनी म्हटले की, “मला लोकांची तुलना करणे योग्य वाटत नाही. आपापल्या शैलीत दोघेही श्रेष्ठ आहेत. रिद्धिमान साहा पारंपरिक खेळ खेळतो. तर रिषभ पंत हा वीरेंद्र सेहवाग सारखा आक्रमक आणि बिनधास्त आहे. दोघांचीही खेळण्याची शैली वेगळी आहे. यात काही शंका नाही की, रिद्धिमान साहाकडे जास्त अनुभव आहे. परंतु रिषभ पंत देखील आपल्या खेळात सुधारणा करत आहे. त्याने कठीण परिस्थितीतही उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. याचा हा अर्थ मुळीच नाही की, साहा चांगला फलंदाज नाहीये. त्याला कोणालाही काहीही सिद्ध करण्याची आवश्यकता नाही.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “एक परिपूर्ण क्रिकेटपटू म्हणून रिषभ पंत खूप पुढे आहे. मुख्यत: त्याने ऑस्ट्रेलियामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. पंतच्या खेळण्याच्या शैलीवरून जाणवते की, तो टी२० स्वरुपामध्ये खूप पुढे जाणार आहे. परंतु त्याने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील वेगवेगळ्या परिस्थितीत ज्याप्रकरचा खेळ केला आहे. त्यातून त्याच्या खेळात खूप बदल जाणवला आहे.”
आता हे सर्व थांबवा…
सध्या हे सर्व थांबवा असे म्हणत, रात्रा म्हणाले की, “तो (रिषभ) अवघ्या २ ते ३ षटकांत ३० ते ३५ धावा करू शकतो. त्याच्याकडे ती कला आहे. त्याला याची उत्तम समज आहे की, केव्हा धावांची गती वाढवायची आहे आणि केव्हा सामना सांभाळून खेळायचा आहे. या बाबतीत मी त्याचे कौतुक करतो. त्याला परिस्थितीनुसार कसे खेळायच हे चांगलेच माहीत आहे. पंतने आता यष्टीरक्षक फलंदाजांबाबत सुरू असलेल्या चर्चांना तात्पुरता पूर्णविराम लावला आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या भूमीत विलियम्सन सपशेल फ्लॉप, फलंदाजी सरासरीत अगदी भारतीय गोलंदाजानेही टाकलंय मागे
क्रिकेट चाहत्यांच्या प्रतिक्षेला पूर्णविराम! कर्णधार अन् सलामीवीराची जोडी करतेय कसून सराव
‘ऑस्ट्रेलिया-इंग्लंड विरुद्ध चमकणारा पंत १०० कसोटी सामने खेळेल,’ अनुभवी यष्टीरक्षकाची भविष्यवाणी