माजी आंतरराष्ट्रीय पंच पिलू रिपोर्टर यांचे रविवारी (3 सप्टेंबर) निधन झाले. त्यांनी आपल्या ठाण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. रिपोर्टर 84 वर्षींचे असून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14 कसोटी आणि 22 वनडे सामन्यांत पंचाची भूमिका पार पाडली. त्यांच्या मागे फरझाना वॉर्डन आणि खुशनुमा दारूवाला असा दोन मुलिंचे कुटुंब आहे.
पिलू रिपोर्टर (Piloo Reporter) यांनी 1984-85 साली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंचाची भूमिका पार पाडली. त्याआधी भारतात देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते नियमितपणे पंचाची भूमिका पार पाडत होते. पिलू रिपोर्टर आणि व्ही के रामास्वामी या भारतीय पंचांच्या जोडीला पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान यांनी पाकिस्तानमध्ये आमंत्रित केले होते. पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील सामन्यात या दोघांनी तटस्त पंचांची भूमिका पार पाडली होती. 1912 नंतर ही पहिलीच वेळ होता, जेव्हा तटस्त सामना अधिकाऱ्यांची जोडी कसोटी सामन्यासाठी उपस्थित होती. 90च्या दशकात जगाभरात तटस्थ पंचांची जोडी म्हणून पिलू रिपोर्टर आणि व्ही के रामास्वामी यांनी ओळख तयार झाली होती. रिपोर्टर पुढे 1992 विश्वचषकातही पंचांच्या भूमिकेत दिसले.
माहितीनुसार पिलू रिपोर्टर महाराष्ट्राच्या विद्युत मंडळात कर्मचारी होते. त्यावेळी बाँबे क्रिकेट असोसिएशनने पंच हवे असल्याची जाहिरात दिली होती. हीच जाहिरात पाहून रिपोर्टर यांनी चाचणी देखील दिली होती. पण काही कारणास्तव त्यांची निवड होऊ शकली नाही. त्यानंतर पुढच्या काळात त्यांनी स्थानिक सामन्यांसाठी पंच म्हणून काम केले आणि यातून त्यांच्यासाठी रणजी ट्रॉफीचे दरवाजे खुले झाले. दीर्घकाळ देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंच राहिलेल्या रिपोर्टर यांना अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि विश्वचषकात पंच म्हणून काम करता आले. रिपोर्टर यांनी आपल्या आयुष्यावर आधारित ‘ऍन अंपायर रिमेंबर्स’ हे पुस्तक देखील लिहिले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील या दिग्गज पंचाच्या निधनामुळे क्रिकेटचे जाणाकार आणि माजी दिग्गज शोक व्यक्त करत आहेत. (Former international umpire Piloo Reporter passed away at 84 )
महत्वाच्या बातम्या –
रोहित-विराटच्या विकेटमुळे भारतीयांचा जीव पडलेला भांड्यात, पण पाकिस्तानी दिग्गज म्हणतोय, ‘बरंच झालं…’
इरफानने उडवली पाकिस्तानची खिल्ली, PAK चाहत्यांना येईल राग, तर भारतीय क्रिकेटप्रेमी होतील खुश; लगेच वाचा