भारतीय क्रिकेट संघाचा ‘रनमशीन’ म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली (Virat Kohli) याला बोर्डाने वनडे संघाच्या नेतृत्त्वपदावरून पायउतार (Virat Kohli ODI Captaincy Removal) केले आहे. भारतीय संघाला डिसेंबर महिन्याच्या अखेरीस दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) जायचे आहे. या दौऱ्यासाठी काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने १८ सदस्यीय कसोटी संघाची घोषणा केली होती. यावेळीच वनडे संघाचा कर्णधार बदलल्याचीही घोषणा केली गेली होती.
केवळ एक प्रेस रिलीज जाहीर करत विराटला वनडे संघाच्या कर्णधारपदावरुन काढून रोहित शर्मा (Rohit Sharma) याला संघाची कमान देण्यात आली असल्याचे बीसीसीआयने सांगितले होते. बीसीसीआयच्या अशा वागण्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यात आता पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू दानिश कानेरिया (Danish Kaneria) यांची भर पडली असून त्यांनी या प्रकरणी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
बीसीसीआयने विराटला कर्णधारपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेताना आदरपूर्वक वागणूक (BCCI’s Rude behaviour) दिली नाही. त्याच्या नेतृत्त्वाखाली टी२० विश्वचषकात भारतीय संघाचे प्रदर्शन चांगले न राहिल्याने त्याच्याविरोधात कठोर निर्णय घेतला आहे, असे कानेरिया यांचे म्हणणे आहे.
यापूर्वी भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासोबत विराटची जोडी टिकू शकली नव्हती. त्यानंतर जेव्हा भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी भारतीय संघात प्रवेश केला, तेव्हाच संकेत मिळायला सुरुवात झाली होती की, द्रविड आणि विराटचीही जोडी बनू शकणार नाही. रोहितला आता वनडेचा कर्णधार बनवले आहे. येत्या दिवसात तो कसोटी संघाचाही कर्णधार बनेल, असे कानेरिया यांना वाटते.
विराट कोहलीला इज्जत मिळायला हवी होती
याविषयी बोलताना कानेरिया म्हणाले की, “तुम्ही तुमच्या कर्णधारालाच सांगितले नाही. विराटची नेतृत्त्वातील आकडेवारी पाहिल्यास, ती अतिशय शानदार राहिली आहे. कर्णधार म्हणून असो वा फलंदाज म्हणून, विराट सर्व विक्रमात सर्वांच्या वरती आहे. विराटला आदर मिळायला पाहिजे होता. जरी त्याला कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नसली, तरीही तो एक सुपरस्टार क्रिकेटपटू आहे.”
“जेव्हा सौरव गांगुलींनी द्रविडची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती, तेव्हाच ही खिचडी शिजायला सुरू झाली होती. बीसीसीआय आता सोशल मीडियावरुन विराटच्या आठवणींबद्दल व्यक्त होते आहे. परंतु त्यांनी हे पाऊल उचलण्यापूर्वी एकदा त्याच्यासोबत बोलायला पाहिजे होते,” असेही ते पुढे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० संघाचे कर्णधारपद मिळूनही खूश नव्हता रोहित?
भारताचा हा फलंदाज म्हणतोय, ‘सलामीवीर असलो तरी, कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार’
पीएसएल २०२२ रिटेंशन: आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ विदेशी खेळाडूंना लागली लॉटरी